लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ: विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी सायंकाळी प्रेरणा स्थळाला भेट देऊन ज्येष्ठ स्वातंत्र्य संग्राम सेनानी तथा ‘लोकमत’चे संस्थापक संपादक जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतले. यवतमाळ येथील प्रेरणास्थळ ऊर्जादायी असल्याचे ते म्हणाले.
रविवारी सायंकाळी त्यांचे प्रेरणास्थळ येथे आगमन झाले. बाबूजींच्या समाधी स्थळाचे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मातोश्री वीणादेवी दर्डा तुळशी वृंदावन येथेही पुष्प अर्पण केले. यावेळी ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते प्रेरणास्थळ येथे वृक्षारोपण करण्यात आले.
जवाहरलालजी दर्डा यांचे कार्य महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी राहिले आहे. नवमहाराष्ट्राच्या उभारणीत त्यांचे मोलाचे योगदान असून, त्यांच्या कार्यामुळे महाराष्ट्राला नवी उंची मिळाल्याच्या भावनाही ॲड. नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केल्या. प्रेरणा स्थळाचा निसर्गरम्य परिसर पाहून आपण भारावून गेलो असल्याचे ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक डाॅ. पवन बनसोड, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, ठाणेदार मनोज केदारे आदींची उपस्थिती होती.
यानंतर लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांच्या निवास स्थानीही त्यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी दर्डा परिवाराच्या वतीने किशोर दर्डा, डाॅ. लव दर्डा, ॲड. प्रचिती शहा आदींनी स्वागत केले. तसेच शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"