अविनाश साबापुरे, यवतमाळ: आडवळणाच्या खेड्यात राहून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणाने पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत चक्क राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. त्याचे नाव आहे तुषार अरुण मानकर आणि त्याचे गाव आहे घाटंजी तालुक्यातले इंझाळा!
अन्न नागरी पुरवठा विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या या परीक्षेचा निकाल मंगळवारी १८ जून रोजी जाहीर झाला. त्यात तुषारचे नाव पहिल्या क्रमांकावर पाहून इंझाळा गावच नव्हेतर अख्खा घाटंजी तालुका आनंदित झाला. तुषारने या परीक्षेत २०० पैकी १८६ गुण मिळवित महाराष्ट्रात अव्वल स्थान पटकावले आहे. विशेष म्हणजे, हे यश मिळविण्यासाठी त्याने कोणत्याही प्रकारचा शिकवणी वर्ग लावलेला नव्हता. त्याने प्राथमिक शिक्षक आर्णीत, माध्यमिक शिक्षण यवतमाळात तर अकरावी-बारावीचे शिक्षकण लातूरमध्ये घेतले. नंतर पुण्याच्या एमआयटीतून अभियांत्रिकीची पदवी घेतली.
एवढ्यावरच न थांबता मुक्त विद्यापीठातून समाजशास्त्रात एमए केले. नेट परीक्षाही उत्तीर्ण केली. हे सर्व झाल्यावर स्पर्धा परीक्षांची तयारी सुरु केली. या दरम्यान जिल्हा परिषद पदभरती, तलाठी पदभरतीसारख्या परीक्षांमध्येही यश मिळविले. तर आता पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून पहिल्या क्रमांकाने यश मिळविले आहे. या परीक्षेच्या तयारीसाठी कोणताही शिकवणी वर्ग त्याने लावला नव्हता, हे विशेष. एमपीएससी, यूपीएससी व इतर परीक्षांची तयारी करता-करताच याही परीक्षेची तयारी झाली, असे तुषार सांगतो.
महाराष्ट्राला मिळाले सव्वातीनशे नवे निरीक्षक
अन्न नागरी पुरवठा विभागाने डिसेंबर २०२३ मध्ये एकंदर ३४५ पदांसाठी परीक्षा जाहीर केली होती. त्यात पुरवठा निरीक्षकांच्या ३२४ आणि उच्चस्तर लिपिकांच्या २१ पदांसाठी २६ ते २९ फेब्रुवारीदरम्यान आयबीपीएसद्वारे परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १८ जून रोजी जाहीर करण्यात आला असून त्यातून ३२१ जणांची पुरवठा निरीक्षक पदासाठी शिफारस करण्यात आली आहे.
कोणत्या विभागाला किती पुरवठा निरीक्षक
- कोकण : ४७
- पुणे : ८२
- नाशिक : ४९
- छत्रपती संभाजीनगर : ८८
- अमरावती : ३५
- नागपूर : २३
आजोबा सदाशिवराव, आई संगीता, वडील अरुणराव यांच्या आशीर्वादामुळे हे यश मिळाले. येत्या आठ ते १५ दिवसात कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया पूर्ण होऊन मला अमरावती विभागात पुरवठा निरीक्षक म्हणून नियुक्ती मिळणार आहे.- तुषार मानकर, इंझाळा