यवतमाळ - राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव संजय देशमुख यांनी यवतमाळातील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला अकस्मात भेट देऊन जणू सर्जिकल स्ट्राईक केला. त्यांनी स्वत:ची फारशी ओळख न देता सलग दोन वेळा तेथील स्थितीची पाहणी केली. तेथील संपूर्ण गोंधळ पुढे आल्याने रुग्णालयातील यंत्रणेची चांगलीच दाणादाण उडाली आहे. दरम्यान रुग्णालय प्रशासनाने खासगी सेवा देणाºया ३० डॉक्टरांना कारणेदाखवा नोटीस जारी केली आहे.
यवतमाळचे जिल्हाधिकारी राहिलेल्या संजय देशमुख यांना येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभाराची कल्पना होतीच. ‘लोकमत’ने नुकताच येथील गोंधळ वृत्तमालिकेद्वारे चव्हाट्यावर आणला. त्याची दखल घेत वैद्यकीय शिक्षण सचिव संजय देशमुख हे बुधवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास येथील शासकीय रुग्णालयात पोहोचले. यावेळी त्यांच्या समवेत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे (डीएमईआर) सहसंचालक डॉ. प्रकाश वाकोडे हेसुद्धा होते. आपली ओळख न देता या दोघांनीही अपघात कक्षासह अनेक वार्डात फेरफटका मारला. तेव्हा अनेक विभाग प्रमुख, सिनीअर डॉक्टर गैरहजर आढळून आले. केवळ सीएमओ व प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची उपस्थिती दिसली. एका खाटेवर दोन रुग्ण असल्याचा प्रकारही दृष्टीस पडला. याशिवाय अस्वच्छता, उर्मट वागणूक, रुटीन ट्रीटमेंट, महत्वांच्या तपासण्यांसाठी करावी लागणारी प्रतीक्षा, अगदीच ज्युनिअर डॉक्टरवर सोपविली गेलेली रुग्णालयाची जबाबदारी असे अनेक प्रकार पुढे आले. रुग्णालयाची टॉप टू बॉटम यंत्रणा गाफिल राहिल्याने व संजय देशमुख यांनी आपल्या दौºयाबाबत प्रचंड गोपनीयता बाळगल्याने रुग्णालयातील ‘वास्तव’ त्यांच्या दृष्टीस पडले. दरम्यान, अधिष्ठाता डॉ. अशोक राठोड यांना कुणकूण लागताच ते रुग्णालयात पोहोचले. मात्र तोपर्यंत देशमुख यांचा राऊंड संपला होता. आपल्याला जायचे आहे, असे सांगून ते निघून गेले. साहेब मुंबईला गेले, असे समजून रुग्णालयाची यंत्रणा पुन्हा सुस्तावली. परंतु गुरुवारी सकाळी ९ वाजण्यापूर्वीच संजय देशमुख व डॉ. वाकोडे यांनी पुन्हा शासकीय रुग्णालय गाठले. यावेळीसुद्धा ‘नेहमीप्रमाणे’ सिनीअर डॉक्टर उपस्थित नव्हते. तब्बल दोन तासांनी हे सिनीअर तेथे पोहोचले. त्यानंतर सचिव देशमुख यांनी आढावा बैठक घेतली. एनपीए घेऊन खासगी सेवा देणाºया डॉक्टरांना देशमुख यांनी चांगलेच फैलावर घेतले. आरोग्य सेवा सुधारा अन्यथा कारवाईला तयार रहा, अशा शब्दात त्यांनी तंबी दिली. महिनाभरानंतर पुन्हा अशीच अकस्मात भेट देऊन तुमच्याकडून येणाºया अहवालांची उलट तपासणी करणार असल्याची तंबीही त्यांनी डॉक्टरांना दिली.