यवतमाळ : नगरपरिषदेच्या विषय समिती सभापती पदासाठी गुरुवारी झालेल्या निवडणुकीत भाजपला चार, तर राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळाली. यवतमाळ नगरपरिषद सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला मदत केली. या उपकाराची परतफेड म्हणून नगरपरिषदेत राष्ट्रवादीला एक सभापतीपद देण्यात आले. नवनिर्वाचित सभापतींमध्ये मनिष दुबे (बांधकाम), कोमल ताजने (शिक्षण), मनोज मुधोळकर (आरोग्य), पंकज मुंदे (नियोजन व विकास), प्रियंका भवरे (महिला व बाल कल्याण) यांचा समावेश आहे. उपाध्यक्ष सुभाष राय यांच्याकडे पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभागाची जबाबदारी दिली.
भाजपचे बहुमत असलेल्या यवतमाळ नगरपरिषदेवर कांचन चौधरी यांच्या रूपाने शिवसेनेचा नगराध्यक्ष आहे. आज स्थायी समितीच्या तीन सदस्य पदासाठीही निवडणूक घेण्यात आली. त्यात भाजपचे अमोल देशमुख, प्रवीण प्रजापती, पल्लवी रामटेके निवडून आले.