लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : राज्य शासनाच्या माझी वसुंधरा अभियानांतर्गत स्पर्धा घेण्यात आली. हे अभियान राबविण्यात यवतमाळ नगर परिषद राज्यात दुसऱ्या क्रमांकाची ठरली आहे. यामुळे नगरपालिकेला पाच कोटींचे बक्षीस मिळाले आहे. यासोबतच जिल्ह्याचाही या अभियानात अमरावती विभागात दबदबा असून, पहिला क्रमांक मिळाला.
माझी वसुंधरा अभियान हे १ एप्रिल २०२३ ते ३१ मे २०२४ या कालावधीत राबविण्यात आले. १ ते ३ लाख लोकसंख्या असणाऱ्या नगर परिषदेच्या गटात यवतमाळ शहराने राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे. हे अभियान तत्कालीन मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्या काळात राबविण्यात आले होते. यासोबतच वणी व दारव्हा नगर परिषद, मारेगाव आणि बाभूळगाव नगर पंचायतीने अमरावती विभाग स्तरावर गुणांकन प्राप्त केले आहे. अमरावती विभागात जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि दोन नगर पंचायती माझी वसुंधरा अभियानात गुणवत्तेत आल्या आहेत.
राज्य शासनाने रोख पुरस्काराच्या विनियोगाची कार्यपद्धती निश्चित करून दिली आहे. यामध्ये ढोबळ मानाने बक्षिसाची ५० टक्के रक्कम शहरात हरित क्षेत्र वाढविण्यासाठी खर्च करावी लागणार आहे. तर ५० टक्के रक्कम पर्यावरणपूरक इतर उपाययोजनांसाठी वापरावी, इतर उपाययोजनांच्या रकमेतून १० टक्क्यांपर्यंतची रक्कम माझी वसुंधरा अभियानामध्ये शहर स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धांच्या विजेत्यांना बक्षीस देण्यास मान्यता दिली आहे.
ही कामे करता येणार बक्षिसाच्या रकमेतून जैवविवि- धतेच्या संवर्धनावर, जुन्या हरित क्षेत्राचे संवर्धन देखभाल, रोपवा- टिकांची निर्मिती, जलसंवर्धन उपक्रम, रेन वॉटर हार्वेस्टिंग, नदी, तळे व नाल्याचे पुनरुज्जीवन, सौर- ऊर्जेवर चालणारे पथदिवे, विद्युत वाहन, चार्जिंग पॉइंट अशा ठळक बाबींवर ही रक्कम खर्च करता येणार आहे.