भाजपाचे वॉक आऊट : पुन्हा रंगले मानापमान नाट्य, विकास कामांना बसली खीळ यवतमाळ : नगरपरिषदेत सध्या नगराध्यक्ष विरुद्ध बहुमतातील भाजपा, असा संघर्ष सुरू आहे. यात गुरूवारी सलग दुसऱ्यांदा स्थायी समितीची सभा तहकूब झाली. भाजपा सभापतींनी बैठकीतून वॉक आऊट केल्याने कोणत्याही कामाला मंजुरी मिळाली नाही. बैठकीत सभापतींचे कक्ष निर्मिती व स्वाक्षरीचा अधिकार, यावरून पुन्हा मानापमान नाट्य रंगले. यापूर्वी स्थायी समितीची सभा भाजपा नगरसेवकांनी वॉक आऊट केल्यामुळे तहकूब झाली होती. शहरातील विविध कामांच्या ३९ विषयांना मंजुरी देण्यासाठी त्या सभेपुढे ठेवण्यात आले होते. यात अनेक जनहिताची कामे अंतर्भूत आहे. याशिवाय शहरातील रखडलेले सफाई कंत्राट, पाणी पुरवठ्याचे नियोजन यासह पावसाळ्यापूर्वीच्या उपाययोजनांचा समावेश आहे. मात्र पालिकेत सभापती व नगराध्यक्ष यांच्यात मानापमान नाट्य सुरू असल्याने कोणतेच काम होताना दिसत नाही. सभापतींना नवीन व त्यांच्या सोयीचे स्वतंत्र कक्ष हवे आहेत. याशिवाय कायदेशीर आधार नसलेला स्वाक्षरी अधिकारही हवा आहे. यावरूनच सभेतून वारंवार वॉक आऊट केले जात असल्याचे नगराध्यक्षांनी सांगितले. या मुद्यावर सातत्याने भूमिका स्पष्ट करूनही सभापतींकडून विकास कामांच्या ठरावाबाबत सहकार्य केले जात नाही. त्यांचे बहुमत असल्याने प्रत्येक विषय अडगळीत टाकण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप नगराध्यक्ष कांचन बाळासाहेब चौधरी यांनी केला. यावर नगराध्यक्ष जाणीवपूर्वक ठरावावर स्वाक्षऱ्या करीत नसल्याचा आरोप भाजपाच्या सभापतींनी केला, तर पालिकेत शिवसेना-भाजपाचे राजकारण सुरू असल्याचा आरोप उपाध्यक्ष सुभाष राय यांनी केला. नगराध्यक्षांकडून सभापतींचा अपमान केला जात असल्याचा आरोप बांधकाम सभापतींनी केला. दोन्ही गटांकडून परस्पराविरूद्ध आरोप होत असून विकासाच्या विरोधात भूमिका असल्याचे सांगण्यात आले. शुक्रवारी झालेल्या स्थायी समिती सभेला उपाध्यक्ष सुभाष राय, आरोग्य सभापती नितीन गिरी, महिला बालकल्याण सभापती सुषमा राऊत, काँग्रेसचे नगरसेवक जावेद अन्सारी, भाजपा नगरसेवक जगदीश वाधवाणी, शिक्षण सभापती व स्वीकृत महिला नगरसेवक उपस्थित होत्या. नऊ सदस्यांपैकी आठ जण बैठकीला आले होते. त्यांनी सुरुवातीलाच आक्षेप घेऊन बैठकीतून वॉक आऊट केले. (कार्यालय प्रतिनिधी)
यवतमाळ पालिकेच्या ‘स्थायी’ची सभा दुसऱ्यांदा तहकूब
By admin | Published: April 28, 2017 2:27 AM