- विशाल सोनटक्के यवतमाळ : जिल्ह्यातील गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून कठोर कारवाई सुरू झाली आहे. या अंतर्गतच पुसद येथील कुख्यात राजेश उंटवाल याला एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले असून त्याची रवानगी अकोला कारागृहात झाली आहे. तर बाभूळगावातील निखिल दहाट याच्यावर एक वर्षाच्या हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.
पुसदमधील मुखरे चौक येथे राहणाऱ्या राजेश दीपक उंटवाल याच्याविरूद्ध गंभीर दुखापत, विनयभंग, साथीदारांसह दंगा करणे, धमकी देणे, घरात घुसून मारहाण करणे तसेच जुगार खेळणे आदी गंभीर स्वरूपाचे दखलपात्र गुन्हे २०१८ पासून पुसद शहर तसेच ग्रामीण पोलिस ठाण्यात आहेत. त्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण केल्याने त्याच्याविरूद्ध एमपीडीए अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव होता. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रस्तावाला २१ डिसेंबर रोजी मंजुरी दिल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेवून अकोला जिल्हा कारागृहात रवानगी केली.
तर बाभूळगाव हद्दीतील निखिल सुरेश दहाट याच्याविरूद्धही जबरी चोरीसह विनयभंगाचे गुन्हे २०१६ पासून होते. त्यानेही बाभूळगाव परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण केल्याने त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव बाभूळगाव पोलिस ठाण्याकडून यवतमाळच्या उपविभागीय दंडाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आला होता. या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर निखिल दहाट याची यवतमाळ जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपारी करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. पवन बनसोड, अपर पोलिस अधीक्षक पीयूष जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक आधारसिंग सोनोने, पुसद शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक उमेश बेसरकर, बाभूळगावचे पोलिस निरीक्षक सुनील हुड आदींच्या नेतृत्त्वाखालील पथकाने ही कारवाई केली.