यवतमाळ : येथील दत्त चौक भाजी मंडीत शुक्रवारी सकाळी झालेल्या युवकाच्या खुनातील आरोपी आर्णी येथे लपले होते. त्यातील एक आरोपी गोलू मेश्राम याने पोलीस उपनिरीक्षक संतोष मनवर यांच्यावर चाकूहल्ला केला. त्यानंतर मनवर यांनी गोलूवर गोळी झाडली. ही गोळी त्याच्या उजव्या पायाला लागली. त्याला उपचारार्थ यवतमाळला हलविण्यात आले आहे. दरम्यान, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी नीलेश पांडे यांनी घटनास्थळ गाठले. अंबिकानगर (पाटीपुरा) येथील क्षितीज भगत (17) याचा तिघांनी धारदार शस्त्राचे 13 वार करून खून केला. या खुनामागे प्रेमप्रकरण असल्याचे पोलिसांकडून सांगितले जाते.
या खुनातील तीनही आरोपी आर्णी येथे लपून असल्याची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या टोळी विरोधी पोलीस पथकाचे उपनिरीक्षक संतोष मनवर सहका-यांसह आर्णीत पोहोचले. आरोपी लपून असलेल्या शिवाजी चौक परिसरातील घराला त्यांनी वेढा घातला. यावेळी आरोपी गोलूवर झडप घालण्यासाठी गेलेल्या मनवर यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला. चाकू त्यांच्या हाताला लागला. यावेळी त्यांनी आपल्या सर्व्हिस रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. ती गोलूच्या पायात लागली. यावेळी तीनही आरोपींना अटक करण्यात आली. फौजदार मनवर यांच्या तक्रारीवरून या आरोपींवर आर्णीमध्ये शासकीय कामात हस्तक्षेप व खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला जाणार आहे.