सुरेंद्र राऊत / यवतमाळयवतमाळ : ड्रग्ज माफियाचे विदर्भातील नेटवर्क चालविणारा यवतमाळ पोलिसांच्या कचाट्यात सापडला आहे. २८ मार्च रोजी एलसीबी पथकाने कळंब येथे एका ड्रग्ज कॅरिअरला ताब्यात घेतले. अंग झडतीत त्याच्याकडून २६ ग्रॅम एमडी ड्रग्ज प्राप्त झाले. या ड्रग्जचा पुरवठा करणारा कोण, त्याचे नाव पुढे येताच एलसीबी पथकाने नागपुरातील निर्मलनगरी टाऊनशिप (नंदनवन पोलिस ठाणे) येथून एकाला अटक केली. त्याच्या जवळून एमडी ड्रग्ज व चरस, रोख रक्कम असा मुद्देमाल रविवार ३० मार्च रोजी जप्त केला.
इस्तीयाक हुसेन मोहसीन हुसेन ऊर्फ इस्तीयाक खादीम (सेवक) (४५) रा. ताजबाग ह.मु. निर्मलनगरी टाऊनशिप नंदनवन नागपूर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. इस्तीयाक हुसेन हा ताजबाग येथे खादीम म्हणजेच सेवक म्हणून राहत होता. या सोबतच त्याने निर्मलनगरी टाऊनशिप येथील उच्चभ्रू वस्तीत फ्लॅट घेऊन तेथून एमडी ड्रग्ज, चरस या अमली पदार्थाचे विदर्भातील नेटवर्क उभे केले होते. त्याचा एक कॅरिअर अभय राजेंद्र गुप्ता (३०) रा. बुटीबोरी हा कळंब येथे ड्रग्ज विक्रीसाठी आला असताना २८ मार्च रोजी यवतमाळ एलसीबी पथकाच्या हाती लागला. अभयच्या कबुलीवरूनच कळंब पोलिस ठाण्यात अभय गुप्ता व इस्तीयाक हुसेन या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ड्रग्ज कॅरिअर अभय गुप्ता याच्याकडून मिळालेली माहिती खरी आहे की नाही, याची पडताळणी करून यवतमाळ एलसीबीतील सहायक निरीक्षक संतोष मनवर व त्याच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी नागपूर गाठले. ताजबाग परिसरात चौकशी केल्यानंतर इस्तीयाक हुसेन हा येथे सेवेकरी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर इस्तीयाक हुसेन याचा निर्मलनगरी टाऊनशिपमध्ये फ्लॅट असल्याचेही पुढे आले. यवतमाळ एलसीबी पथकाने अतिशय गोपनीय पद्धतीने माहिती गोळा करून इस्तीयाक हुसेन याच्या फ्लॅटवर धाड टाकली. तिथे त्यांना १५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि १० ग्रॅम चरस मिळाली. सोबतच अमली पदार्थ विक्रीतून आलेले दोन लाख ३८ हजार रुपये रोखही आरोपीजवळ सापडले. या कारवाईने नागपूर शहरात खळबळ उडाली आहे.
नागपूरमध्ये स्वतंत्र एनडीपीएस स्कॉड असूनही त्यांना अमली पदार्थ नेटवर्क चालविणाऱ्याची लिंक मिळाली नाही. यवतमाळ एलसीबीच्या पोलिसांनी कळंबमध्ये कारवाई केल्यानंतर तिथेच न थांबता पुरवठादार कोण याचा शोध सुरू ठेवला. यातून विदर्भात नेटवर्क चालविणारा इस्तीयाक हुसेन ऊर्फ खादीम हाती लागला. ही कारवाई पोलिस अधीक्षक कुमार चिंता, अपर अधीक्षक पीयूष जगताप, एलसीबी प्रमुख सतीश चवरे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक संतोष मनवर, जमादार योगेश गटलेवार, विनोद राठोड, प्रशांत हेडाऊ, अजय डोळे, रितुराज मेडवे, नीलेश राठोड, आकाश सहारे यांनी केली.
मध्य प्रदेश कनेक्शन असल्याचा संशयविदर्भातील गावखेड्यापर्यंत एमडी ड्रग्ज, चरस हे महागडे अमली पदार्थ पोहोचविले जात आहे. हे नेटवर्क चालविणारा इस्तीयाक हुसेन यवतमाळ पोलिसांच्या हाती लागला आहे. त्याच्याकडे अनेक कॅरिअर्स काम करतात. मात्र, इस्तीयाक हुसेन याला अमली पदार्थ कोठून येते यावर यवतमाळ पोलिस काम करीत आहे. प्राथमिक अंदाजानुसार एमडी ड्रग्ज व इतर अमली पदार्थाचे कनेक्शन हे मध्य प्रदेशमध्ये जोडले जात असल्याचे सांगण्यात आले.