यवतमाळ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर झाला. यात जिल्ह्याचा निकाल ९१.९८ टक्के इतका लागला असून यंदाही मुलांपेक्षा मुलींनीच पुन्हा एकदा बाजी मारल्याचे स्पष्ट झाले. यंदा जिल्ह्यातून २९ हजार ९०७ नियमित विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली. त्यापैकी २७ हजार ५०१ विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. विशेष म्हणजे १५१२ विद्यार्थ्यांनी प्राविण्यश्रेणी मिळविली आहे. तर ८ हजार ५५३ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेत. १३ हजार २०४ विद्यार्थ्यांना द्वितीय श्रेणीवरच समाधान मानावे लागले. अभ्यासक्रम शाखानिहाय विचार करता यंदा विज्ञान शाखेचा सर्वाधिक म्हणजे ९७.८४ टक्के निकाल आला आहे. त्याखालोखाल वाणिज्य शाखेचा ९२.२८ टक्के तर कला शाखेचा निकाल केवळ ८६.९१ टक्के इतका लागला आहे. तर व्यावसायिक अभ्यासक्रमातून ८७.५८ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
यावर्षी जिल्ह्यातील १४ हजार २७५ विद्यार्थी बारावीत उत्तीर्ण झाले असून त्यांच्या निकालाची टक्केवारी ९०.१० टक्के आहे. तर १३ हजार ६८५ विद्यार्थिनींनी बारावी निकालात यश मिळविले असून त्यांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही ९४.०२ इतकी आहे. बारावीच्या निकालाचा तालुकानिहाय विचार करता यंदा महागाव तालुक्याचा निकाल सर्वाधिक म्हणजे ९६.०९ टक्के लागला आहे. त्यानंतर नेर तालुक्यानेही बाजी मारत ९५.९३ टक्के विद्यार्थ्यांना यश मिळवून दिले आहे. बाभूळगावमधून ९४.८५ टक्के विद्यार्थी यशस्वी झालेत. आर्णी ९४.२६, उमरखेड ९३.६१, दारव्हा ९३.६०, यवतमाळ ९२.३८, पुसद ९२.२६, कळंब ९२.२१, घाटंजी ९१.६९, दिग्रस ९१.३५, झरी ९०.५६, राळेगाव ९०.५६, मारेगाव ८९.८९, पांढरकवडा ८८.०६, तर वणी तालुक्याचा निकाल सर्वात कमी म्हणजे ८०.८७ टक्के लागला आहे.