यवतमाळ : भूसंपादन उपजिल्हाधिकारी यांच्यापुढे फाईल ठेवण्यासाठी कार्यालयातील वरिष्ठ लिपिक महिलेने चक्क दोन हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडी अंती तिने दीड हजार रुपयांची लाच स्वीकारली. हा सर्व प्रकार पुनर्वसन कार्यालयात गुरूवारी दुपारी घडला. एसीबी पथकाने तत्काळ लाचखोर लिपिक महिलेला अटक केली.
शैला मडावी असे लाच घेणाऱ्या वरिष्ठ लिपिक महिलेचे नाव आहे. त्या पुनर्वसन व भूसंपादन विभागात कार्यरत आहेत. निम्न पैनगंगा प्रकल्पातील बाधित शेतकऱ्याने प्रकल्पात गेलेली शेती मुलगा व मुलीच्या नावाने करण्यासाठी अर्ज केला. याची फाईल भूसंपादन अधिकाऱ्याच्या पुढे ठेवण्यासाठी शैला मडावी यांनी दोन हजारांची लाच मागितली. संबंधित शेतकऱ्याने याची तक्रार एसीबीकडे केली. एसीबी पथकाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नवीन प्रशासकीय इमारतीत असलेल्या कार्यालयातच लाच घेतली. यावेळी एसीबी पथक व पंच उपस्थित होते. त्यानंतर शैला मडावी यांना अटक करण्यात आली. ही कारवाई यवतमाळ एसीबी पथकाने केली.
प्रशासनाला लाचखोरीची कीड
जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामविस्तार अधिकारी या दोघांवर लाच मागितल्याचा गुन्हा दाखल झाला. ही कारवाई होऊन आठवडा उलटत नाही तोच जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात प्रकल्प बाधित शेतकऱ्याकडून लाच घेताना महिला लिपिक अडकली. यावरून प्रशासनाला लाचखाेरीची कीड लागल्याचे स्पष्ट होते. ग्रामविकास व महसूल अशा दोन्ही विभागातील अधिकारी, कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकले आहेत.