- रुपेश उत्तरवार यवतमाळ - हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्याच्या शेतात जाणारा रस्ता इतर शेतकऱ्यांनी अतिक्रमीत केला आहे. यामुळे पांडुरंगच्या शेतातील कापणीस आलेला ऊस गतवर्षी शेतकऱ्यांना नेताच आला नाही. या प्रकरणात उमरखेड उपविभागीय अधिकाऱ्यांनी नुकसान भरपाईसह रस्ता तत्काळ उपलब्ध करून देण्याचे आश्वासन मे महिन्यात दिले होते. मात्र त्याची पूर्तता झाली नाही. यावर्षी ऊस काढणीला आला आहे. यामुळे रस्त्याच्या मागणीसाठी पांडुरंगने टॉवरवर चढून शोले स्टाइल आंदोलन केले.
हिवरी येथील शेतकरी पांडुरंग सखाराम आंडगे या शेतकऱ्यांच्या शेतशिवारात जाण्यासाठी ४० फुटांचा पांदण रस्ता मंजूर आहे. या पांदण रस्त्याच्या एका बाजूला नाला आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी केवळ पाऊलवाट उरली आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेला ऊस कारखान्यापर्यंत नेता येत नाही. गतवर्षी याच प्रकारामुळे शेतकऱ्यांचा अडीच एकरातील तीन लाखांचा ऊस शेतातच वाळला. यामुळे शेतकऱ्याने महागाव तहसीलसमोर मुलाबाळासह आंदोलन केले. यावेळी त्यांना पांदण रस्ता मोकळा करण्याचे आश्वासन दिले. तहसीलदारांच्या आश्वासनानंतरही त्याची पूर्तता झाली नाही.
लोकशाहीदिनी असंख्य तक्रारी केल्या. इतकेच नव्हे तर १ जानेवारीपासून आझाद मैदानात बेमुदत उपोषण सुरू केले होते. या आंदोलनाची शासकीय यंत्रणेने दखल घेतली नाही. यामुळे पांडुरंगने शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून आंदोलन केले. रस्ता मोकळा करून द्यावा आणि गतवर्षी झालेली नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. रात्री उशिरापर्यंत शेतकरी टॉवरवरच बसून होता. शासकीय यंत्रणेकडून वारंवार विनंती झाली. मात्र शेतकऱ्याचे समाधान झाले नाही.अडीच तास आरडीसीकडे मात्र तोडगा नाहीदरम्यान या प्रकरणात वारकरी शेतकरी संघटनेचे सिकंदर शाह आणि शिष्टमंडळ आरडीसीच्या दालनात अडीच तास थांबले. मात्र त्यांच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न झाला नाही. असा आरोप शेतकरी वारकरी संघटनेने केला आहे.