स्वतंत्र विदर्भ राज्याची गुढी : पेट्रोल पंपांसह व्यावसायिक प्रतिष्ठानांचा उत्स्फूर्त सहभाग यवतमाळ : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुकारण्यात आलेल्या बंदला शुक्रवारी यवतमाळात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पेट्रोल पंपांसह बहुतांश सर्व व्यावसायिक प्रतिष्ठाने दिवसभर बंद होती. तर येथील नेताजी भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याची गुढी उभारुन शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. विदर्भवाद्यांनी गुढी पाडव्याच्या दिवशीच विदर्भ राज्यासाठी बंदची हाक दिली होती. मराठी नववर्षाचा पहिला दिवस असतानाही यवतमाळात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकाळपासून सर्व प्रतिष्ठाने बंद दिसत होते. या बंदमध्ये शहरातील १२ पेट्रोल पंप सहभागी झाले होते. शहरातील मेनलाईन, सरदार वल्लभाई पटेल चौक, मारवाडी चौक, छोटी गुजरी, आर्णी मार्ग, दारव्हा मार्ग, वडगाव, वाघापूर यासह इतर भागातील दुकानेही कडकडीत बंद होती. नववर्षाच्या पहिल्या दिवशीच बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. शहरातील पेट्रोल पंपही बंद होते. केवळ भाजी मार्केट सुरू असल्याने त्या परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी गर्दी दिसत होती. येथील नेताजी भवनावर स्वतंत्र विदर्भ राज्याची गुढी उभारण्यात आली. यावेळी माजी खासदार जांबुवंंतराव धोटे यांच्यासह विदर्भवादी कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी केली. तसेच शहरातून रॅली काढण्यात आली. यानंतर माजी खासदार जांबुवंतराव धोटे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यवतमाळचे सुपुत्र आहे. अणेंबद्दल वाट्टेल ते बोलले जाते. त्यांनी विदर्भातील जनतेचे मत मांडले होते. मात्र स्वार्थी नेते मंडळी स्वतंत्र विदर्भाची मागणी जनतेची नसल्याचे सांगत आहे. शुक्रवारी बंदची हाक देताच स्वयंस्फूर्तीने बंद पाळण्यात आला. हा सर्वात मोठा पुरावा आहे. विदर्भातील जनतेला स्वतंत्र विदर्भ हवा आहे. श्रीहरी अणे एकटे नाही आम्ही त्याच्या पाठीशी आहोत असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार विजयाताई धोटे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत, लालजी राऊत, श्रीराम खिरेकर, अॅड. अजय चमेडिया, नारायण काझी, उषा निकम, जयश्री राठोड, गणेश कोचरकर, डॉ. दंदे, शेख जाकीर, बाबू डोळे, शाहेद सिद्दीकी यांच्यासह मोठ्या संख्येने विदर्भ प्रेमी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)
यवतमाळ कडकडीत बंद
By admin | Published: April 09, 2016 2:34 AM