यवतमाळ : येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्याची जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठाने संशोधनासाठी निवड केली आहे. चिन्मय सतीश हरिदास असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.भारत सरकार आणि अमेरिकन सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना ‘खोराना स्कॉलर’ ही शिष्यवृत्ती दिली जाते. त्यात केवळ ५० जणांची निवड करण्यात येते. यंदा निवड झालेल्या देशातील ५० विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळच्या चिन्मयचीही निवड झाली आहे. चिन्मय मूळचे नागपूर येथील रहिवासी असून, ते येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत आहे. चिन्मय १८ मे ते ३१ जुलैपर्यंत अमेरिकेत हार्वर्ड विद्यापीठात राहून तेथील संशोधकांसोबत संशोधन करणार आहेत. ‘न्यूरो सायन्स’ (मेंदूविकार शास्त्र) असा त्यांच्या संशोधनाचा विषय आहे. डॉ. देशमुख, डॉ. बच्छेवार, डॉ. हिंगवे, डॉ. पोफाळी आणि डॉ. गुजर यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याची कृतज्ञता चिन्मयने व्यक्त केली.
अभिमानास्पद! यवतमाळच्या विद्यार्थ्याची हार्वर्ड विद्यापीठात निवड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2020 9:41 PM