यवतमाळ : खुल्या जागेवर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा करून ठेवायचा आणि नंतर त्याची विक्री करायची, अशा प्रकारचा नवीन फंडा रेतीमाफीयांकडून वापरला जात आहे. प्रशासनाकडूनही अशा रेतीसाठ्यांवर कारवाईची धडक मोहीम राबविणे सुरू आहे. यवतमाळ तालुक्यात एकाच आठवड्यात दहा रेतीसाठ्यांवर कारवाई करण्यात येऊन ३८५ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणत अवैध रेतीचा व्यवसाय फोफावला आहे. यातूनच शक्य असेल तेंव्हा रेतीघाटांवरून मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा करून ती शहरातील विविध अशा दुर्लक्षित परिसरात जमा केली जाते आणि तेथून मग ती अव्वाच्या सव्वा दराने सर्वसामान्य नागरिकांना अथवा बिल्डरांना विकली जाते. ही बाब ध्यानात घेता जिल्हा प्रशासनाने रेतीच्या नियमबाह्य प्रमाणात असलेल्या ढिगाऱ्यांवर कारवाई करून जप्तीची मोहीम उघडली आहे. त्यातूनच जिल्हाभरात तहसील कार्यालयांकडून अशाप्रकारे लाखो रुपयांची रेती जप्त करण्यात येत आहे. एकट्या यवतमाळ तालुक्यात आठवडाभरात दहा ठिकाणी धाडी घालण्यात येऊन ३८५ ब्रास रेती जप्त करण्यात आली आहे. यामध्ये भोसा वळणमार्ग, भोसा मार्गावरीलच गजानन नगरीजवळ, प्रिंस गॅरेज परिसर या ठिकाणांवरून चार साठे जप्त करण्यात आले. तर दारव्हा रोड परिसरातून एक व खानगाव येथील एक रेतीसाठा जप्त करण्यात आला. इतर चार साठेसुद्धा वेगवेगळ्या परिसरातून जप्त करण्यात आले आहे. लवकरच या साठ्यांचा लीलाव करण्यात येणार आहे. मागील वर्षी ३४ रेतीसाठे जप्त करण्यात आले होते. त्यातील केवळ तीन साठ्यांचा लीलाव करण्यात आला. ३१ साठ्यांवर स्टे आल्यामुळे त अद्याप तसेच पडून आहेत. परंतु नागरिकांना याबाबतची माहिती नसल्याने वारंवार याच साठ्यांची तक्रार येते. कुणाचे बांधकाम सुरू असेल व त्या ठिकाणी रेतीचा थोडाफार साठा असेल तर कोणतीही कारवाई होण्याची शक्यता नसते, कारण ती रेती बांधकामासाठी विकत घेतलेली असते. परंतु अनेक रेतीमाफिये रेतीचा मोठ्या प्रमाणात एकांत ठिकाणी खुल्या जागेमध्ये अथवा एखाद्याच्या प्लॉटवर साठा करून नंतर त्यांची विक्री करतात. अशा साठ्यांची माहिती मिळाल्यास त्यावर मात्र निश्चित कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या प्लॉटवर अशाप्रकारचे रेतीसाठे आढळून येतील, त्या प्लॉटमालकावरही कारवाई होऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी वेळीच सबंधित तहसील कार्यालयाला माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले. (प्रतिनिधी)नागरिकांना आपल्या परिसरात अथवा अनधिकृतरित्या कुण्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रेतीचा साठा आढळून येत असल्यास आणि त्या ठिकाणाहून रेतीची विक्री होत असल्याची माहिती असल्यास त्यांनी तहसील कार्यालयात तक्रार करावी, या तक्रारींची निश्चित दखल घेण्यात येईल. - सचिन शेजाळ, तहसीलदार, यवतमाळ
यवतमाळ तालुक्यात ३८५ ब्रास रेतीसाठा जप्त
By admin | Published: July 19, 2016 2:37 AM