पंचायत समितीत भगवा : काँग्रेस, राष्ट्रवादीला प्रत्येकी एक जागासुरेंद्र राऊत यवतमाळयवतमाळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या चारपैकी प्रत्येक दोन जागा भाजप-शिवसेनेने जिंकल्या आहेत. पंचायत समितीत शिवसेना हा सर्वाधिक संख्याबळ असलेल्या पक्ष असून भाजप, शिवसेनेला जनमताचा कौल मिळाला आहे. सेनेने आठपैकी चार जागा जिंकल्या आहेत. तर भाजपचे दोन व काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार विजयी झाला आहे. हिवरी-अकोलाबाजार गटातून भाजपच्या रेणूताई संजय शिंदे ह्या सर्वाधिक (६,३९७) मते घेऊन विजयी झाल्या. त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष धनराज चव्हाण यांच्या पत्नी चंद्रकला चव्हाण यांचा तब्बल ९७२ मतांनी पराभव केला. शिंदे यांचा यवतमाळ तालुक्यातील मोठा विजय आहे. हिवरी पंचायत समिती गणातून भाजपाच्या सुनिता सुभाष मडावी यांनी ३,३०९ मते घेत विजय प्राप्त केला. तर अकोलाबाजार गणात मात्र शिवसेनेचे गजानन रामकृष्ण पाटील यांनी २,४४० मते घेऊन भाजपाच्या थावरू चव्हाण यांना पराभूत केले. चिंचघाट-येळाबारा गटात शिवसेनेच्या सचिन रवींद्र राठोड यांनी पहिल्या फेरीपासूनच वर्चस्व कायम राखत विजय प्राप्त केला. त्यांनी ४,६३५ मते घेऊन काँग्रेसचे बबनराव धुमाजी जाधव यांचा पराभव केला. पंचायत समितीच्या चिंचघाट गणात शिवसेनेच्या नंदा ज्ञानेश्वर लडके यांनी २,१८५ मते घेऊन विजय प्राप्त केला. तर येळाबारा गणात उज्वला राजेंद्र गावंडे यांनी २,३०७ मते घेत वर्चस्व कायम राखले. तिवासा-रूई गटात शिवसेना तालुकाप्रमुख किशोर इंगळे यांच्या पत्नी कविता इंगळे यांनी ४,३९६ मते घेऊन विजय संपादित केला. इंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी जिल्हाध्यक्ष क्रांती राऊत (धोटे) यांचा पराभव केला. या गटातील तिवसा पंचायत समिती गणातून राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष नरेश ठाकूर हे भरघोस (३,७६७) मतांनी विजयी झाले. शिवसेनेच्या अनूप रामचंद्र चव्हाण यांचा पराभव केला. रुई पंचायत समिती गणात शिवसेनेने वर्चस्व कायम ठेवत कांता संजय कांबळे यांनी ३,२५० मते घेतली. या गणात राष्ट्रवादीने शिवसेनेला जोरदार लढत दिली. आसोला-तळेगाव गटात यवतमाळ बाजार समितीचे सभापती व काँग्रेसचे उमेदवार रवींद्र ढोक यांचा दारूण पराभव झाला. भाजपाचे उमेदवार श्याम द्वारकाप्रसाद जयस्वाल यांनी शिवसेनेच्या राजू नागरगोजे यांचा केवळ ३८५ मतांनी पराभव केला. आसोला पंचायत समिती गणातून शिवसेनेचे एकनाथ पंजाब तुमकर हे २,५६१ मतांनी विजयी झाले. तर तळेगाव गटातून भाजपाच्या सुनंदा प्रदीप भुजाडे यांनी ३११३ मते घेत शिवसेनेच्या मंदा गाडेकर यांचा पराभव केला. गाडेकर या जिल्हा परिषदेच्या विद्यमान सदस्य आहेत. यवतमाळ तालुक्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसेचे वर्चस्व होते. सात जिल्हा परिषद सदस्यांपैकी तीन सदस्य काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस दोन, शिवसेना दोन असे संख्याबळ होते. यवतमाळ नगरपरिषदेची हद्दवाढ झाल्यानंतर येथील तीन जिल्हा परिषद गट रद्द झाले. नव्या रचनेनुसार अस्तित्वात आलेल्या चार गटांपैकी दोन गट शिवसेनेने कायम राखले. तर दोन गटांतून भाजपाने पहिल्यादांच जिल्हा परिषदेत ‘एंट्री’ केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला एकही जागा राखता आली नाही. शिवाय पंचायत समितीतही पुन्हा शिवसेनेचा भगवा फडकणार आहे. आता शिवसेनेकडे चार सदस्य असून सत्ता स्थापनेसाठी त्यांना एकाच सदस्याची आवश्यकता आहे. बाजार समितीतील समीकरणानुसार सेना^-राकाँची मदत घेऊन सत्तेत बसण्याची शक्यता आहे. मात्र वेळेवरच्या घडामोडीत समीकरण बदलू शकते.
यवतमाळ तालुक्यात भाजप-शिवसेनेला कौल
By admin | Published: February 24, 2017 2:35 AM