यवतमाळ - मागील चार दिवसापासून जिल्ह्यातील नागरिक उत्तर भारतातील थंडी सारखा अनुभव घेत आहेत. या थंडीमुळे सायंकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास रस्त्यावर शुकशुकाट पाहावयास मिळत आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषी विज्ञान केंद्रांमध्ये यावर्षी सर्वाधिक कमी ६.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त २५.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. या बोचऱ्या थंडीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहेत.
गेल्या वर्षी सर्वात कमी ६.१ अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद करण्यात आली होती. मात्र हे तापमान केवळ एकच दिवस होते. यावर्षी डिसेंबरच्या 15 तारखेनंतर थंडीला सुरुवात होऊन २४ डिसेंबर पर्यंत तापमानचा पारा हे ११ अंश सेल्सिअस वर होते. मध्यंतरी या तापमानात पुन्हा वाढ झाली होती. मात्र मागील तीन दिवसांपासून थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील ६.४ अंश सेल्सिअस तापमान हे विदर्भातील अकरा जिल्ह्यातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे.