लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे अटल महापणन विकास अभियान राबविले जात आहे. या अभियानात डबघाईस आलेल्या सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.यवतमाळ जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखला जातो. जिल्ह्याची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक आहे. या स्थितीवर मात करून जिल्ह्यातील २४० सहकारी संस्था या अभियानात स्वबळावर उभ्या राहण्यासाठी तयार झाल्या. यातील १२२ सहकारी संस्थांनी स्वत:चा स्वनिधी वापरून व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायात संस्थेने स्वत:चा निधी गुंतवून उत्पन्न वाढविले आहे. विशेष म्हणजे पूर्वी ९० टक्के संस्थांचा व्यवसाय केवळ कर्ज वितरण करणे आणि तो वसूल करणे एवढाच होता. आता अटल महापणन विकास अभियानाच्या माध्यमातून विविध नावीन्यपूर्ण व्यवसायाची निवड सहकारी संस्थांनी केली आहे.रासायनिक खत विक्री, आरो वॉटर, माती परीक्षण प्रयोगशाळा, गाव पातळीवर एटीएम, गांडूळ खत निर्मिती, क्लिनींग ग्रेडींग युनिट या व्यवसायासह अनेक व्यवसायांचा यामध्ये समावेश आहे. पूर्वी या संस्था ‘ब’ आणि ‘क’ आॅडिटमध्ये आल्या होत्या. त्यांच्याकडे निधी नसल्याने त्या अवसायनात जाण्याचा धोका होता. मात्र आता महाअभियानामुळे या संस्था नव्याने कामाला लागल्या. यातून गाव पातळीवरील सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन होत आहे. त्याचा लाभ थेट शेतकऱ्यांना आणि गावकऱ्यांना मिळणार आहे.या अभियानात राज्यात यवतमाळ जिल्ह्याने उत्तम कामगिरी केली. विशेष म्हणजे अवसायनात पडलेल्या संस्थांना बळकट करण्यात पुणे आणि मुंबईदेखील मागे पडले आहेत. सहकार क्षेत्रात उत्तम कार्य करण्यास गेल्या ७३ वर्षांच्या इतिहासात विदर्भातील यवतमाळ प्रथमच पुढे आले. पुणे दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे.क्रांतीदिनी यवतमाळचा पुण्यात सत्कारसहकार आयुक्तालयाने ९ ऑगस्टला पुण्यात आढावा बैठक घेतली. या बैठकीत सहकार मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक डॉ.राजाराम दहे उपस्थित होते. त्यांनी अटल महापणन अभियानातील यवतमाळ जिल्ह्याच्या कामाचे कौतुक केले. जिल्हा व्यवसाय विकास व पणन व्यवस्थापक अक्षय देशमुख यांचा सत्कारही केला.योजनेच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल आहे. ही जिल्ह्याच्या इतिहासातील पहिली घटना आहे. यातून सहकार चळवळीला नवी दिशा मिळेल. गावांचा विकास होण्यास मदत होईल.- अर्चना माळवीजिल्हा उपनिबंधक, यवतमाळ.
सहकाराच्या अंमलबजावणीत यवतमाळ राज्यात अव्वल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 11:54 AM
सहकार पणन व वस्त्राद्योग विभागातर्फे सहकारी संस्थांचे पुनरुज्जीवन केले जात आहे. राज्यातील पाच हजार संस्था या माध्यमातून सक्षम केल्या जाणार आहे. यवतमाळ जिल्हा या अभियानात पहिल्या क्रमांकावर आहे.
ठळक मुद्देसहकारी संस्थांचे बळकटीकरण पुणे दुसऱ्या, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर