अविनाश साबापुरे।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना काळात शाळा बंद असतानाही अल्पसंख्य विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी शिक्षण विभागाची धडपड सुरू आहे. त्यातही यवतमाळ जिल्ह्याने मुदतीपूर्वीच ९६ टक्के काम पूर्ण करून राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे. एकूण ३२ हजार ७३४ पैकी तब्बल ३१ हजार ३३७ अर्ज भरून यवतमाळच्या शिक्षकांनी आघाडी घेतली आहे.
राज्यातील मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शिख, पारसी धर्मीय विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो. २००८-०९ या सत्रापासून सुरू झालेली ही योजना पंतप्रधानांच्या १५ कलमी कार्यक्रमाअंतर्गत राबविली जात आहे. यंदा केंद्राने महाराष्ट्रासाठी २ लाख ८५ हजार ४५१ विद्यार्थ्यांचा कोटा निश्चित केला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचे आॅनलाईन अर्ज १६ आॅगस्ट ते ३१ आॅक्टोबर या कालावधीत आॅनलाईन मागविण्यात आले आहे. २०२०-२१ या सत्रात धार्मिक अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर ही प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती थेट बँक खात्यात अदा केली जाणार आहे.
मागील सत्रात ज्यांना शिष्यवृत्ती मिळाली, त्यांचे अर्ज ‘रिनिव्हल’करिता ३१ आॅक्टोबरपूर्वी एनएसपी पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. यवतमाळातील अशा ३२ हजार ७३४ पैकी तब्बल ३१ हजार ३३७ अर्ज आतापर्यंत भरले गेले आहेत. ही टक्केवारी तब्बल ९६ टक्के आहे. उर्वरित जिल्ह्यांचे हे काम जेमतेम ६० टक्क्यांपर्यंत होऊ शकले.महाराष्ट्रात केवळ ६० टक्के काममागील सत्रात महाराष्ट्रात ६ लाख ९८ हजार ७११ विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र होते. यंदा त्यापैकी केवळ ४ लाख २१ हजार १४० विद्यार्थ्यांचे अर्ज रिनिव्हलसाठी भरले गेले. केवळ ६० टक्के काम झाले.