यवतमाळ: शनिवारी मध्यरात्री यवतमाळ शहरासह जिल्हयाच्या ग्रामिण भागाला मुसळधार पावसाने झोडपले. या पावसामुळे दारव्हा -यवतमाळ मार्गावरील शेलोडी गावाजवळील पूल मध्यरात्री अडीचच्या सुमारास सुरू झालेल्या पावसाने वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तर बोरी ( बु.) येथे मुसळधार पावसामुळे नाल्याचे पाणी गावामध्ये घुसले. हे पाणी सुमारे २५ घरामध्ये घुसल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल झाले.
प्रशासनाने रात्री साडेतीनच्या सुमारास या भागातील नागरिकांना सुरक्षित भागात हलविण्यास सुरूवात केली. दरम्यान बोरी अरब पासून चार कि.मी. अंतरावर असलेल्या हातगाव येथील अडाण नदीलाही पूर आला असून, यापुलाच्या चार फुट वरून पाणी वाहत असल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.
उमरखेड, धानोऱ्यातही शनिवारी जोरदार पाऊस झाला. तब्बल दीड तास कोसळलेल्या जोरदार पावसाने उमरखेड तालुक्यातील विडुळ नजीक असलेल्या धानोरा साचदेव शिवारात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने शेत शिवाराचे नुकसान झाले आहे.