राजेश निस्ताने - यवतमाळ आगामी विधानसभा निवडणुकीला चार महिने अवकाश असला तरी सर्वच पक्ष आणि संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच जोरदार तयारी चालविली आहे. त्यातही गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या उमेदवारांची संख्या पाहता सर्वाधिक धुमशान यवतमाळ विधानसभा मतदारसंघातच होण्याची चिन्हे आहेत. यवतमाळ विधानसभा मतदारसंघ गेल्या काही वर्षात कधी भाजपाकडे तर कधी काँग्रेसकडे राहिला आहे. २00९ मध्ये काँग्रेसच्या नीलेश पारवेकरांनी हा मतदारसंघ भाजपाकडून खेचून घेतला. मात्र पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच दुर्दैवाने त्यांचे अपघाती निधन झाले. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर त्यांच्या पत्नी नंदिनी नीलेश पारवेकर विजयी झाल्या. पारवेकर दाम्पत्याने भाजपाचे माजी आमदार मदन येरावार यांना पराभूत केले. आता २0१४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वांनीच कंबर कसली आहे. या निवडणुका युती आणि आघाडीत लढल्या जाणार, असे मानून इच्छुकांनी तयारी चालविली आहे. यवतमाळवर यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने फेरबदलात दावा सांगितला आहे. शिवसेनेकडे मात्र सक्षम उमेदवार दिसत नाही. राष्ट्रवादीला हा मतदारसंघ सुटल्यास विधान परिषद सदस्य संदीप बाजोरिया उमेदवार राहू शकतात. परंतु सध्या तरी काँग्रेस आणि भाजपा आपला दावा सोडण्यास तयार नाही. भाजपा आणि काँग्रेस या दोनही पक्षात उमेदवारीसाठी जोरदार रस्सीखेच आहे. काँग्रेसच्या विद्यमान आमदार नंदिनी पारवेकर यांनी तिकीट कापले जाऊ नये म्हणून आपले राजकीय गॉडफादर मुख्यमंत्र्यांपर्यंत फिल्डींग लावली आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पूत्र राहुलसाठी यवतमाळ मतदारसंघावर लक्ष केंद्रीत केले आहे. परंपरागत दिग्रस-दारव्हा मतदारसंघात शिवसेनेचे नेटवर्क तोडण्यात गेल्या पाच वर्षात यश न आल्याने ठाकरे पिता-पूत्रांनी आपले बस्तान यवतमाळ मतदारसंघात हलविल्याचे दिसते. याशिवाय काँग्रेसकडून जीवन पाटील, माजी आमदार संजय देशमुख, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मांगुळकर यांची नावे चर्चेत आहेत. ऐनवेळी आणखी एखादे नाव आश्चर्यकारकरीत्या पुढे येण्याची शक्यता आहे. भाजपाकडून मदन येरावार प्रबळ दावेदार आहे. मात्र त्यांना आव्हान देत माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, राष्ट्रवादीतून दीड वर्षांपूर्वी भाजपात दाखल झालेले जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब गाडे पाटील यांनीही उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी चालविली आहे. मनसेनेही भाजपाच्या एका नाराज पदाधिकार्याला रिंगणात उतरविण्याची तयारी चालविली आहे. जिल्हा बँकेचे संचालक तथा महसूल कर्मचारी संघटनेचे नेते रवींद्र देशमुख यांनीही अपक्ष लढण्याची घोषणा केली आहे. या दृष्टीने त्यांची राजकीय व प्रशासकीय खेळी सुरू आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील, भाजपातून बाबासाहेब गाडे पाटील बंडखोरीच्या तयारीत आहेत. यवतमाळ नगरपरिषदेतील गटबाजीच्या राजकारणाचाही विधानसभेवर इफेक्ट होणार आहे. त्यातही नगराध्यक्ष योगेश गढिया यांनी येरावारांना पाहून घेण्याची भाषा वापरल्याने सर्वाधिक फटका भाजपाला बसण्याची चिन्हे आहेत. लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून शिवसेनेला २८ हजार ३८८ मतांची आघाडी मिळाली. हा कल युतीला दिलासा दायक वाटत असला तरी मोदी लाटेचा प्रभाव आणखी किती दिवस राहतो यावर बरेच काही अवलंबून आहे. नंदिनी पारवेकरांना मतदारांनी सहानुभूती दाखवूनही त्या आपला प्रभाव पाडू शकल्या नाहीत. त्यामुळे काँग्रेसच्या गोटातूनच ‘चेंज’चा सूर ऐकायला मिळत आहे. हाच सूर तोच तो कर्मशियल चेहरा पाहून विटलेल्या भाजपा कार्यकर्त्यांचाही आहे.
यवतमाळ मतदारसंघातच होणार सर्वाधिक धुमशान
By admin | Published: June 09, 2014 12:07 AM