यवतमाळ : मतदानाचा टक्का शहरी भागात घटला आहे. त्यातही यवतमाळ विधानसभा क्षेत्रात कमी मतदान झाले. यावर मात करण्यासाठी वीणादेवी दर्डा स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्याच्या माध्यमातून मंगळवारी यवतमाळकरांचे प्रबोधन केले. पथनाट्याच्या माध्यमातून विविध विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. यामुळे हे पथनाट्य नागरिकांसाठी प्रेरणादायी ठरले.
मंगळवारी यवतमाळ शहरातील स्टेट बँक चौक, बसस्टँड चौक, दत्त चौक, बिरसा मुंडा चौक, दर्डानगर चौक या ठिकाणी वीणा देवी दर्डा स्कूलच्या १० वीमधील विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केले. मतदान का आवश्यक आहे, सुयोग्य उमेदवार कसा निवडावा, आपल्या मताची किंमत किती, निवडणुकीतील गैरप्रकार, विकासकामे आणि जनसामान्यांच्या प्रश्नांकडे लोकप्रतिनिधींकडून होणारी डोळेझाक, या बाबी विद्यार्थ्यांना नाटकाच्या माध्यमातून मांडल्या. या नाटकांनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले.
जवाहरलाल दर्डा एज्यूकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार डॉ. विजय दर्डा यांच्या प्रेरणेने अध्यक्ष देवेंद्र दर्डा, शाळा समिती अध्यक्ष किशोर दर्डा, स्कूलचे प्राचार्य अमीन नुरानी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे सादरीकरण केले. या सादरीकरणाची जबाबदारी शैक्षणिक व्यवस्थापक प्रसाद मिसाळ यांनी स्वीकारली होती. यामध्ये सेजल माळवी, स्वरा निलावार, तनिशा भूत, कोनिका दत्त, ज्योती तिवारी, आभास वानखडे, आदिब शेख, जैनम मुथा, अंशुल राय, अर्चित आडे, कृष्णा पाटील, धैर्य मेश्राम, सोहम देशमुख, यश चव्हाण, आर्यन राठोड, ललित वानखडे, अमृतेश देशपांडे, अर्णव जयस्वाल यांनी भूमिका पार पाडली. यावेळी मीना मोटे, प्रवीण दीघाडे, ऋषभ पवार, गुलशन शेडमाके उपस्थित होते.