यवतमाळ : बंगरूळ येथे झालेल्या १७ व्या राष्ट्रीय टेनिस बॉल उच्च वरिष्ठ गट स्पर्धेत महाराष्ट्र राज्य संघाने विजयी परंपरा राखत तिसऱ्यांदा अजिंक्यपद पटकावले. या निमित्ताने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत विजयाची हॅट्ट्रीक करून यवतमाळचा नावलौकिक झाला आहे. बंगरूळच्या क्रांती रिवा स्टेडियमवर ही स्पर्धा झाली. स्पर्धेत आंध्र प्रदेश, केरळ, तमीळनाडू, कर्नाटक या राज्यांवर मात करीत महाराष्ट्राच्या संघाने सुवर्ण पदक पटकाविले. या यशस्वी संघात राणी लक्ष्मीबाई विद्यालयाचे गजानन चौधरी, शिवाजी विद्यालयाचे मनोज येंडे, श्री साई विद्यालयाचे जितेंद्र सातपुते, बाबूसिंग चव्हाण मूक बधिर विद्यालय मोहदा येथील सचिन भेंडे हे क्रीडा शिक्षक व पोलीस विभागातील विजय मोगरे, पांडुरंग कवारसे, प्रशिक्षक एम.एन. मीर, तर व्यवस्थापक संजय सातारकर यांचा समावेश होता. यशस्वी खेळाडूंना विजयी चषक सुवर्ण पदक व प्रमाणपत्र टेनिस व्हॉलिबॉलचे जनक डॉ.व्यंकटेश वागवांड, रघुवीर गोडा, बी.एच. चंद्रशेखर आदींच्या हस्ते देण्यात आले. जिल्हा टेनिस व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष अरविंद तायडे, उपाध्यक्ष प्रदीप बनगिनवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, मुख्याध्यापक मनोज इंगोले, मोहन मडावी, मुख्याध्यापिका ज्योती देशपांडे, शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड, राज्य क्रीडा मार्गदर्शक किशोर बोंडे, प्रताप पारस्कर, पंकज इंगळे, पीयूष भुरचंडी आदींनी कौतुक केले. (स्थानिक प्रतिनिधी)
राष्ट्रीय स्पर्धेत यवतमाळला अजिंक्यपद
By admin | Published: April 18, 2016 4:59 AM