आॅनलाईन लोकमतयवतमाळ : आर्थिक मोबदल्याचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींची राज्याबाहेर विक्री करून त्यांचे विवाह लावण्याचा प्रयत्न येथे उधळला गेला. येथील एका अल्पवयीन मुलीने यातून कशीबशी सुटका करीत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यावरून मुलीची आई व मध्यस्थी करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक केली.शहरातील चमेडीयानगरमध्ये घरकाम करणाऱ्या एका कुटुंबात दोन मुली आहेत. या मुलींना श्रीमंत घरातून मागणी आहे, असे म्हणून सुनिता गेडाम रा. बेंडकीपुरा या महिलेने चक्क गुजरातमधील अहमदाबादची सोयरीक आणली. त्या मुलाने मंगळवारी यवतमाळ गाठून दोन्ही मुलींना पाहिले. त्याने मोठेऐवजी लहानीला मागणी घातली. त्यानंतर या मुलीची आई व मध्यस्थी करणारी सुनिता ह्या दोघीही विवाह करण्यासाठी त्या लहान मुलीची मनधरणी करू लागल्या. या प्रकाराला मुलीच्या वडिलांचा विरोध होता.सदर मुलाचा अहमदाबादमध्ये साबणाचा कारखाना असल्याचे सांगण्यात आले. त्या मुलीला आई व मध्यस्थी करणाऱ्या महिलेने घराबाहेर पडू नको, अशी तंबी दिली. मात्र तिने मोबाईल रिचार्ज करण्याचा बहाणा करून घरातून सुटका करवून घेतली. ती मुलगी मंगळवारी रात्री १0 वाजता घराबाहेर पडली. मंगळवारची संपूर्ण रात्र तिने आठवडी बाजारातील मंदिरात काढली. दुसऱ्या दिवशी बुधवारी वडील शोध घेतील म्हणून तिने थेट शहर पोलीस ठाणे गाठले. तेथे तिचे वडील उपस्थित होते.
यापूर्वीही घडले प्रकारमुलीने पोलिसांत स्वत:ची आई व विवाहाचे स्थळ आणणाऱ्या सुनिता गेडामविरूद्ध तक्रार दिली. त्यावरून त्यांच्याविरूद्ध बाल विवाह रोकथाम अधिनियमानुसार गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी सुनिताला अटक केली. सहायक निरीक्षक राजू वटाणे तपास करीत आहेत. यापूर्वीही सुनिताने असे विवाह लावल्याची शक्यता आहे.