यवतमाळ : आशियाई देशातील महिला आर्किटेक्चर यांची स्पर्धा दिल्लीमध्ये पार पडली. या स्पर्धेत कमी खर्चामध्ये दर्जेदार डिझाईन आणि विविध कलाकृतींची प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. विविध देशातील १५ हजारांवर महिला आर्किटेक्चर सहभागी झालेल्या या स्पर्धेत यवतमाळ येथील प्राची प्रसन्न सुराणा ही सुवर्ण पुरस्काराची मानकरी ठरली आहे. प्राची ही भारतीय जैन संघटना, यवतमाळचे सल्लागार महेंद्र सुराणा यांची नात आहे.
प्राची सुराणा यांनी पाच वर्षांचा आर्किटेक्चर अभ्यासक्रम पुणे येथे पूर्ण केला. त्यानंतर त्या अहमदाबादमधील सेप्ट विद्यापीठात दोन वर्षांचा स्पेशलायझेशन इंटिग्रेटेड आर्किटेक्चर या अभ्यासक्रमाचे शिक्षण घेत आहेत. अंतिम वर्षाचा अभ्यास करीत असलेल्या आर्किटेक्चरसाठी दिल्लीमधील ललित हॉटेल प्रगती मैदानावर या सेमिनारचे आयोजित करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी भारतासह श्रीलंका, सिंगापूर आणि मलेशियामधील १५ हजार महिला आर्किटेक्चरनी सहभाग घेतला होता. यातील १,५०० आर्किटेक्चरची उत्तम कामगिरी म्हणून निवड झाली. त्यातील सर्वोत्तम कामगिरी असणाऱ्या प्राची प्रसन्न सुराणा यांना सुवर्ण पुरस्काराचा मान मिळाला. आर्किटेक्चर क्षेत्रामधील हा सर्वाधिक उच्च प्रतिचा बहुमान मानला जातो.
प्राचीने या स्पर्धेमध्ये दोन गटांत सहभाग नोंदविला होता. त्यातील एका गटामध्ये प्रोजेक्ट, तर दुसऱ्या गटामध्ये पेंटिंग साकारायची होती. या दोन्ही गटांमध्ये प्राचीचे कौतुक झाले आहे. बेघरांसाठी वसाहत अशी संकल्पना प्रात्याक्षिकातून मांडली होती. यामध्ये एकाच जागी बेघरांचे निवासस्थान, बाजारपेठ, रुग्णालय, शाळा आणि विविध सुविधा देण्याचा हा प्रयोग स्पर्धेत सादर केला. याशिवाय ॲप्सट्रॅक पेंटिंग तिने साकारली. इतर आर्किटेक्चरच्या तुलनेत प्राचीचे प्रात्याक्षिक वेगळे होते. ते बहुपयोगी होते. याचा वापर सरकारला बेघरांचे शासकीय बांधकाम करताना होणार आहे. यामुळे तिला सुवर्ण पुरस्काराने गौरविण्यात आले.
तुर्की देशात विशेष अभ्यासक्रम
प्राचीने तुर्कीमध्ये आर्किटेक्चर डिझायनरचा दोन महिन्यांचा अभ्यासक्रम केला आहे. याव्यतिरिक्त तिला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. तिने आपल्या यशाचे श्रेय कुटुंबीयांना दिले आहे. आजी, आजोबा, आई-वडील, भाऊ यांच्यामुळे हे यश मिळाल्याचे प्राचीने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.