आॅनलाईन लोकमतयवतमाळ : प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात यवतमाळचा शिवमसिंग दीपकसिंग दुधाने हा विद्यार्थी झळकणार आहे. गु्रप कमांडर होण्यासाठी त्याने प्रयत्न सुरू केल्याने तो अग्रस्थानी राहिल्यास नवल वाटू नये. जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तो ग्रुप कमांडर देखील बनेल.यवतमाळातील अतिशय सामान्य कुटुंबातील शिवमसिंग दुधाने कला द्वितीय वर्षाला शिक्षण घेतो. हैदराबाद येथे झालेल्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या (प्री आर.डी.) शिबिरामधून त्याची दिल्लीत होणाऱ्या राष्ट्रीय प्रजासत्ताक शिबिरासाठी निवड झाली आहे. तो यवतमाळ येथील नानकीबाई वाधवाणी कला महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. महाविद्यालयाकडून वेळोवेळी मिळालेले प्रोत्साहन आणि सहकार्याच्या भवरवशावर त्याने अमरावती विभागीय शिबिरातून सोलापूर येथील राज्यस्तरीय शिबिरासाठी आपले स्थान निश्चित केले. राष्ट्रीय सेवा योजनेतून शिस्त, स्वयंशासन, सांस्कृतिक कार्याचे धडे घेतलेल्या शिवमसिंगने मागे वळून पाहिले नाही. शिवमसिंग हा यवतमाळच्या जयहिंद क्रीडा मंडळाचा कबड्डी खेळाडू आहे. मंडळाचे अध्यक्ष प्रदीप वानखडे, नव जयहिंद मंडळाचे अध्यक्ष विनायकराव बोदडे आदींच्या मार्गदर्शनात तो तयार झाला आहे.हैदराबाद येथे झालेल्या प्री आर. डी. शिबिरासाठी त्याने झेप घेतली. अर्थात हे शिबिर दिल्ली गाठण्यासाठी परीक्षा घेणारे होते. रासेयो पथकाच्या हैदराबाद शिबिरासाठी महाराष्ट्रातून ५६ मुला-मुलींची निवड झाली होती. यातून सहा मुले आणि सहा मुली अशा फक्त १२ जणांची निवड दिल्ली येथे प्रजासत्ताक दिन पथसंचलनासाठी झाली. त्यातही शिवमसिंगची कामगिरी सरस ठरली. निवड झालेल्या १२ विद्यार्थ्यांमधून तो पहिला आहे. सर्वाधिक गुण घेत त्याने आपले स्थान दिल्ली पथसंचलनासाठी निश्चित केले. संस्थेचे अध्यक्ष जगदीश वाधवाणी, प्राचार्य डॉ.जयंत चतूर, रासेयो कार्यक्रम अधिकारी संजय राचलवार यांचे प्रोत्साहन आपल्यासाठी मोलाचे ठरल्याचे शिवमसिंग दुधाने सांगतो.वेळेचे भान, शारीरिक क्षमता, शिस्त, व्यायाम, तंदुरुस्ती आणि सांस्कृतिक कार्याची पारख करून दिल्ली परेडसाठी निवड केली जाते. या सर्व परीक्षेत शिवमसिंग यशस्वी ठरला. कुटुंबातील प्रत्येक सदस्यांची वेळोवेळी पाठीवर पडलेली थाप त्याचा आत्मविश्वास वाढवत गेली. आता त्याने याच जोरावर रासेयो पथकाचा ग्रुप कमांडर होण्याची तयारी सुरू केली आहे. या परेडसाठी दिल्ली येथे १ जानेवारीपासून शिबिर होत आहे. कबड्डी, रनिंग, नृत्य या विषयाची आवड शिवमसिंगला आहे. दिल्ली परेडसाठी निवड होऊन त्याने यवतमाळच्या शिरपेचाात मानाचा तुरा खोवला आहे.
दिल्लीच्या पथसंचलनात झळकणार यवतमाळचा शिवमसिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 01, 2018 1:54 PM
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनात यवतमाळचा शिवमसिंग दीपकसिंग दुधाने हा विद्यार्थी झळकणार आहे.
ठळक मुद्देप्रजासत्ताक दिन परेडग्रुप कमांडरसाठी धडपड