यवतमाळ : संपूर्ण जगात हाहाकार उडविणाºया कोरोना व्हायरसच्या जोखडातून जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील विद्यार्थिनी सुरखरूप घरी परतली आहे. चीनमधील वुहान येथे ती एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या द्वितीय वर्षाला आहे. भारतात परत आल्यानंतर तिला १४ दिवस भारतातील मनसर येथील आयटीबीटी कॅम्पमध्ये निगराणीत ठेवण्यात आले होते. सर्व चाचण्यात निगेटीव्ह रिपोर्ट आल्यानंतर तिला मूळ गावी आणण्यात आले आहे.
स्नेहल मोरेश्वर चटकी रा. चिंचमंडळ ता. मारेगाव, असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. ती वैद्यकीय पदवीच्या द्वितीय वर्षाला आहे. कोरोना व्हायरसची लागन झाल्यानंतर चीनमधील भारतीय दुतावासाकडून तिला २ फेब्रुवारी रोजी भारतात परत आणण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून स्नेहलला इतर विद्यार्थिनीसोबतच मनसर येथील विलिगीकरण कक्षात ठेवण्यात आले. सलग १४ दिवस तिच्या विविध तपासण्या करण्यात आल्या. हे सर्व रिपोर्ट निगेटीव्ह आले. कोरोनाची कोणतीच बाधा झाली नसल्याची खात्री केल्यानंतर १८ फेब्रुवारीला स्नेहलला तिच्या गावी सोडण्यात आले.
जिल्हा शल्य चिकित्सकांकडूनही स्नेहलच्या प्रकृतीबाबत वारंवार विचारपूस केली जात आहे. मारेगाव येथील वैद्यकीय अधिकाºयांना तसे निर्देश देण्यात आले आहे. स्नेहलचे वडील मोरेश्वर चटकी यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी स्रेहलची प्रकृती ठणठणीत असल्याचे सांगितले.