पुसद : कोरोनामुळे यंदा कर्तव्य आहे, असे म्हणणाऱ्या अनेक जोडप्यांचा हिरमोड झाला. अनेकांनी ठरलेल्या शुभमुहूर्तावरील लग्न पुढे ढकलले. बोहल्यावर चढणाऱ्यांची संधी कोरोनाने हुकली. मात्र, मुहूर्त हुकलेल्या अनेकांसाठी आता गुड न्यूज आहे. यंदा चातुर्मासातदेखील ३६ लग्नाचे मुहूर्त आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव संपण्याचे नाव घेत नाही. जुलै महिन्यापासून चातुर्मास सुरू होत आहे. त्यामुळे अनेकांना लग्नासाठी पुढच्या वर्षीचा शुभमुहूर्त निश्चित करण्याची वेळ आली. लग्नाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेकांसमोर आता पुढे काय असा प्रश्न निर्माण झाला. मात्र, यंदाच्या चातुर्मासातही विवाह मुहूर्त निश्चित करण्यात आले आहेत. चातुर्मासात लग्न करणे आता शुभ मानले जाणार आहे. पंचांगकर्त्यांनी या शुभमुहूर्ताला दुजोरा दिला आहे.
आषाढ शुक्ल एकादशीपासून कार्तिक शुक्ल एकादशीपर्यंत चातुर्मास असतो. या महिन्यात पाऊस भरपूर पडत असल्याने आणि पूर्वी प्रवासाची साधने नसल्याने व शेतीची कामे असल्याने विवाह करण्याची प्रथा नव्हती. आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे पंचांगात पुढील विवाह मुहूर्त देण्यात आले आहेत. कोरोनामुळे लोकांना विवाह स्थगित करावे लागले तरी चिंता करण्याचे कारण नसल्याचेही पंचांगकर्ते सांगत आहेत.
लॉकडाऊनमुळे अनेकांना मोठा फटका बसला. विशेष म्हणजे ज्यांचं लग्न या लॉकडाऊनमध्ये नियोजित होतं, त्यांना नाईलाज म्हणून लग्न स्थगित करावं लागलं, पण त्यानंतर चांगला मुहूर्त नसल्याने काहीजणांची लग्न अजून झालेली नाही, अशा समस्त लग्नाळू मंडळींसाठी ही गूड न्यूज आहे.
बॉक्स
दोनाचे चार हात करण्याची संधी
आषाढ, श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे मुहूर्त असल्याचे पंचागकर्ते सांगत आहेत. शास्त्रानेसुद्धा या मुहूर्तांना योग्य सांगितले आहे, त्यामुळे रखडलेल्या लग्नांचा आता खुशाल बार उडवून दोनाचे चार हात करण्याची संधी आहे. यंदा आषाढ श्रावण, भाद्रपद आणि अश्विन महिन्यातही लग्नाचे भरपूर मुहूर्त आहेत. पंचांगात याला आपात्कालीन (गौण विवाह) मुहूर्त म्हणतात.
बॉक्स
असे असतील मुहूर्त
आषाढ ७ मुहूर्त,
श्रावण १३ मुहूर्त,
भाद्रपद ४ मुहूर्त,
आश्विन १२ मुहूर्त
एकूण ३६ विवाह मुहूर्त