निलेश यमसनवार
पाटणबोरी(यवतमाळ) : पाणी ओढण्याच्या मोटारीचा वायर नदीच्या पाण्यात पडला. परिणामी नदीच्या पाण्यात वीज प्रवाह संचारला. याचवेळी नदीवर आंघोळीसाठी गेलेल्या एका तरूणाने नदीच्या पाण्याला स्पर्श करताच, शॉक लागून त्याचा जागीच मृत्यू झाला.
ही घटना शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास येथून जवळच असलेल्या कोदोरी या गावी घडली. अशोक विठ्ठल कुरमेलकर (३७) असे मृताचे नाव आहे. ऐन अक्षय तृतियेच्या दिवशी घडलेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
शनिवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास अशोक कुरमेलकर हा तरुण आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला होता. त्याने नदीतील पाण्याला स्पर्श करताच, त्याला विजेचा शॉक बसला आणि पाण्यातच त्याचा मृत्यू झाला. अशोक हा बाराही महिने दररोज सकाळी पैनगंगा नदीवर आंघोळ करायला जात असे. शनिवारी अक्षय तृतीया असल्याने तो सकाळी साडेसात वाजताच आंघोळीसाठी पैनगंगा नदीवर गेला होता. त्याच्या मागे आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व बराच मोठा आप्तपरिवार आहे. पांढरकवडा पोलीस घटनास्थळावर पोहोचले असून घटनेचा तपास सुरू आहे.