लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सराईत गुन्हेगारांकडून बालकांचा वापर केला जातो. यवतमाळ शहरासह ग्रामीण भागातही विधिसंघर्षग्रस्त बालकांची संख्या वाढत आहे. तो प्रौढ होईपर्यंत अनेक गंभीर गुन्हे त्याच्या शिरावर असतात. खून, लूटमार, अत्याचार या गुन्ह्यांतील आरोपी हे तरुण १८ ते ३० या वयोगटातीलच आहे. सामाजिक स्वास्थ्य बिघडत चालल्याचे हे लक्षण आहे. वेळीच तरुणांना चांगले पर्याय उपलब्ध करून दिले नाही तर गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढत आहे. काही सराईत गुन्हेगारांकडून अशा मुलांना नादी लावले जाते. यवतमाळ शहरात तर मुलांना सोबत घेऊन गांजा व दारुसारखे व्यसन लावले जाते. नंतर त्यांचा पद्धतशीरपणे वापर होतो. शरीर दुखापतीसोबतच मालमत्तेसंबंधित गुन्ह्यातही तरुणांचाच सहभाग मोठ्या प्रमाणात आहे. कायद्याचा धाक नसल्यासारखे ते वावरतात. २७८ बंदिवान ३० च्या आत - खुनासारख्या गंभीर गुन्ह्यात १८ ते ३० वयोगटातीलच बंदींचा समावेश आहे. तरुणाई गुन्ह्यात अडकत आहे. - क्षुल्लक कारणावरून भररस्त्यात खून करणाऱ्यांची संख्या कारागृहात वाढत चालली आहे.
मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न कारागृहात १८ ते ३० वयोगटातीलच बंदींची संख्या सर्वाधिक आहे. या मुलांनी गंभीर गुन्हा केला याची जाणीवच त्यांना राहत नाही. कारागृहात मात्र वास्तव काय आहे हे त्यांना दिसते. अशा बंदींना चांगल्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न केला जातो, त्यासाठी मार्गदर्शन शिबिरही होतात. - कीर्ती चिंतामणी, कारागृह अधीक्षक
पालकांचे लक्ष आहे का?
यवतमाळ शहरासह ग्रामीण भागात शाळकरी मुलांमध्ये धारदार हत्यार बाळगण्याचा ट्रेंड आहे. मुले गांजाच्या नशेला बळी ठरत आहे. मुलांना मोबाईल, वाहन सहज उपलब्ध होते. पालक वर्ग आपल्या दैनंदिन कामातच व्यस्त असतो. त्यामुळे मुलांच्या हालचालींकडे लक्षच देता येत नाही. यातूनच मुले वाममार्गाला लागतात. जेव्हा माहिती होते, तेव्हा वेळ निघून गेलेली असते.
मुलांचा कल ओळखणे आवश्यकमुलांच्या किशोरवयातील मानसिक अवस्थेत बदल होतात. या काळात त्यांना कुटुंबातील व्यक्तींनी वेळ देणे गरजेचे आहे. मुलांचा कल लक्षात घेवून त्यांची एनर्जी, खेळ, संगीत या माध्यमातून बाहेर काढावी. यातून चांगले सामाजिक वातावरणही तयार करता येते. - डाॅ.प्रशांत चक्करवार, मानसोपचार तज्ज्ञ