आसिफ शेख
फोटो
जवळा : गावातील काही ध्येयवेड्या तरुणांनी एकत्रित येऊन गाव हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समिती स्थापन करून त्यांनी शाहू महाराजांच्या जयंतीपासून उपक्रमाला सुरुवात केली आहे.
समितीने गावातील नागरिकांना एक झाड देण्याचा आगळावेगळा कार्यक्रम हाती घेतला आहे. गावात या तरुणांना मोठ्या प्रमाणात लोकांचे सहकार्य मिळत आहे. सध्या गावातील स्मशानभूमी, मुस्लिम कब्रस्तान, शाळा, महाविद्यालये, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड केली जात आहे.
छत्रपती शिवाजी महाराज निसर्ग सेवा समितीमधील तरुणांनी पुढाकार घेऊन वृक्ष लागवड करून निसर्गाशी प्रेमाचे नाते जोडण्याचा उपक्रम सुरू केला आहे. समितीने वृक्ष लागवडीचा ध्यास घेत प्रत्येकाने प्रामाणिकपणे वृक्षाची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे आवाहन केले आहे. आशिष ढाकुलकर, नरेश रामटेके, शेख आसिफ, सुहास पंचभाई, ज्ञानदीप चोपडे, गणेश धानोडे, गजानन हटवारे आदींनी आपले गाव हिरवेगार करण्याचा संकल्प केला आहे.
बॉक्स
१५० रोपट्यांची लागवड
आजपर्यंत समितीच्या माध्यमातून १५० झाडांची लागवड करण्यात आली. समिती सदस्य स्वखर्चाने वृक्ष विकत घेऊन हा उपक्रम राबवीत आहे. व्हाॅट्सॲप ग्रुप व फेसबुकच्या माध्यमातून माहिती मिळवून नागरिकांना झाड भेट दिले जात आहे. या अभिनव उपक्रमाला गावकऱ्यांचे सहकार्य मिळत आहे.