यवतमाळ : राज्यातील भाजपा-शिवसेना युती सरकारला चार वर्षे पूर्ण झाले. सरकारकडून सर्वत्र कौतुक व उत्सव केला जात असताना यवतमाळात मात्र काँग्रेसने बुधवार ३१ आॅक्टोबर हा ‘निषेधासन’ दिन म्हणून पाळला.
काँग्रेसने येथील आझाद मैदान स्थित महात्मा गांधींच्या पुतळ्याच्या परिसरात भाजपा सरकारच्या निषेधाची फलके लावली. सरकारने गेल्या चार वर्षात दिलेली आश्वासने व त्यातून जनतेची झालेली दिशाभूल याचा संगम साधत उपरोधिक आसनांचे फलक लावले. त्या सर्व फलकांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वेगवेगळ्या आसनांचे छायाचित्र आहे. त्यावर अभ्यासासन, भक्तासन, वासाळासन, गाजरासन, निषेधासन आदी आसने नमूद आहे. या आसनांमागील अर्थही लिहिला गेला आहे.
सरकारने गेली चार वर्ष कशी अभ्यासात घालविली, भक्तांनी कशी वाचाळ वक्तव्य केली, नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यांवर जनतेला कसे गाजर दाखविले आदीबाबींचा उहापोह या आसनांच्या निमित्ताने युवक काँग्रेसकडून फलकांवर करण्यात आला आहे. या फलकांवर पंतप्रधान व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्यात आले. या आंदोलनात जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे, माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल राऊत आदींनी सहभाग घेतला.