लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : शहरातील जाम मार्गावरील मुलकी परिसरात रामकृष्णनगर येथे युवकाचा धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. जुगार खेळताना झालेल्या वादातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. मंगळवारी सकाळी ६ वाजता ही घटना उघडकीस आली.
प्रफुल्ल गणेश बडदे (२५, रा. मुलकी) असे मृताचे नाव आहे. तो याच परिसरातील टाॅवरजवळ टपरीसमोर बसून मद्यपान करीत होता व जुगार खेळत होता. पहाटे २ च्या सुमारास जुगारावरून वाद झाला. प्रफुल्लच्या डोक्यावर, हातावर, कमरेवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. यात तो जागीच ठार झाला. हा प्रकार परिसरातील नागरिकांना सकाळी ६ वाजता आढळून आला. घटनास्थळी अंथरुण व पांघरुणावर रक्ताचा सडा पडला होता. मारेकऱ्याचे बूटही घटनास्थळी पडून होते. प्रफुल्ल हा अवैध दारू विक्री व जुगार यासारख्या अवैध व्यवसायातही गुंतला होता. सोमवारी दुपारी त्याचा आर्णी नाका परिसरात काही युवकांसोबत वाद झाला होता. त्यातूनच हा खून झाला की रात्रीच्या जुगाराच्या डावात झालेल्या वादातून प्रफुल्लची हत्या झाली, याचा शोध अवधूतवाडी पोलीस घेत आहेत.
घटनास्थळावर एका टपरीसमोर हा खून झाल्याने बघ्यांची गर्दी जमली होती. घटनास्थळाला उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बाविस्कर, स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख प्रवीण परदेशी, अवधूतवाडीचे ठाणेदार मनोज केदारे यांच्यासह ठसेतज्ज्ञांनीही भेट दिली. घटनास्थळावर काही पुरावे हाती लागतात काय, याचा शोध पोलिसांनी घेतला.
पोलिसांनी लगेच या गुन्ह्यातील संशयितांची पोलिसांनी लगेच धरपकड सुरू केली. अवधूतवाडी ठाण्यातील शोध पथकाने पाच संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, ज्यांच्यावर दाट संशय असलेले सतीश कुचनकर व गोलू घायवान (दोघेही रा. दांडेकर लेआऊट, मुलकी) हे पसार आहेत. त्यांचा शोध पोलीस घेत आहे. वृत्त लिहिपर्यंत या प्रकरणात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती. अवधूतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. शिवाजीनगरातील खुनाच्या घटनेची शाई वाळत नाही तोच मुलकीत खून झाला. यावरून शहरात पुन्हा खुनाचे सत्र सुरू होते की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.
अवैध दारू, जुगार सुरूच
मुलकी परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचे गुत्ते आहेत. येथे रस्त्यावरच जुगारही चालत असल्याचे घटनास्थळी दाखल महिलांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले. उपविभागीय अधिकारी माधुरी बाविस्कर यांच्यासमोरच दारूविक्रीच्या आरोपावरून दोन महिलांमध्ये भांडण जुंपले होते. परिसरातील नागरिक या अवैध व्यवसायाने त्रस्त असल्याचे येथील महिलांनी सांगितले. या भागात गुन्हेगारीला पूरक वातावरण अवैध व्यवसायातून निर्माण होत असल्याची तक्रार नागरिकांची आहे.