यवतमाळ - मराठा आरक्षणासाठी आठवडाभरापासून येथे बेमुदत उपोषण सुरू आहे. मंगळवारी एका युवकाने अचानक उपोषण मंडपात येऊन सर्वांपुढे विष प्राशन केले. त्यामुळे एकच तारांबळ उडाली. अशोक देवराव जाधव (३५, रा. जेवली, ता. उमरखेड) असे युवकाचे नाव असून त्याच्यावर यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुपारी उपोषण मंडपात काही जणांची भाषणे सुरू होती. त्यावेळी अचानक अशोक जाधव हे पुढे आले आणि कुणाला काही कळण्यापूर्वीच त्यांनी हाती असलेले कोराजेन नावाचे विषारी औषध प्राशन केले.
युवकांचे मुंडन; रास्ता राेकाेहीधाराशिव : मराठा आंदोलकांनी मंगळवारी धाराशिव, कळंब, येडशी येथे महामार्ग रोखून आंदोलन केले. तुळजापूर येथे महाआरती करण्यात आली. तेर गावात २० युवकांनी मुंडन करून सरकारचा निषेध केला. सोलापूर-धुळे महामार्गावर सांजा ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले.
जलसमाधी आंदोलनमोहोळ (जि. सोलापूर) : भोगावती नदीकाठी बंधाऱ्यालगत भोयरे गावासह मोहोळ तालुक्यातील शेकडो मराठाबांधव व शेतकऱ्यांनी जलसमाधी आंदोलन केले. चार दिवसांत निर्णय झाला नाही तर उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.
रुग्णालयातून लढाछत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ठिकठिकाणी उपोषण करणाऱ्या आणखी तिघाजणांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात पती-पत्नी आणि अन्य एकाचा समावेश आहे. रुग्णालयात दाखल झाल्यानंतरही लढा देत त्यांनी उपोषण सुरू ठेवले आहे.