पेंढारीची घटना : एकीला झाले कन्यारत्न तर दुसरी गरोदर लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : इंटरनेट, सोशल मीडिया आणि टीव्हीने आजची पिढी वाममार्गाला लागत असल्याचा सूर शहरी भागात ऐकायला येतो. परंतु कोणत्याही अत्याधुनिक साधन सुविधांचा गंध नसलेल्या एका गावातील तरुणाने दोन तरुणींवर मातृत्व लादले. आणि आपले बिंग फुटेल या भीतीने पुण्याकडे धूम ठोकली. मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील या दोघींनी ठाण्यात तक्रार दिली तेव्हा पोलिसही अचंबित झाले. शारीरिक आकर्षणातून तरुण-तरुणी एकमेकांच्या प्रेमात पडण्याचे प्रकार नवीन नाहीत. शहरी व ग्रामीण भागात अशा अनेक भानगडी ऐकायला व पाहायला मिळतात. परंतु मारेगाव तालुक्यातील पेंढरी येथील गोलू देवनाथ जुमनाके (२२) याने गावातील दोन तरुणींना आपल्या नादी लावले. मिसरूडही फुटले नाही अशा गोलूने जानेवारी २०१६ मध्ये गावातील एका तरुणीला प्रेम पाशात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यात ती गरोदर झाली. याच दरम्यान नोव्हेंबर २०१६ मध्ये गावातील दुसऱ्या एका तरुणीवर त्याचा जीव जडला. तिलाही लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले. दोघीही गरोदर असल्याचे गोलूला समजताच त्याने गावातून पुण्याचा रस्ता धरला. पहिल्या तरुणीला त्याच्यापासून मुलगी झाली, तर दुसरी तरुणी आता सहा महिन्यांची गरोदर आहे. या दोन्ही तरुणी गुरुवारी रात्री ९ वाजता मारेगाव पोलीस ठाण्यात धडकल्या. त्यांनी आपबिती सांगितली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आता गोलूचा शोध मारेगाव पोलीस कसा, घेतात आणि गोलू या दोन्ही चिमुकल्यांचे पालकत्व स्वीकारणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दोघींवर मातृत्व लादून तरुणाचे पुण्याला पलायन
By admin | Published: June 24, 2017 12:35 AM