यवतमाळ : वर्ष समारोपाच्या जल्लोषासाठी सज्ज असलेल्या गुरुजींच्या आनंदावर ‘यूडायस’चे सावट आले आहे. केवळ दोन दिवसात तब्बल पाच लाख विद्यार्थ्यांची माहिती यूडायस प्लस प्रणालीत भरण्याचे आदेश शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी दिले आहेत. त्यासाठी शनिवारी आणि रविवारी म्हणजे थर्टी फर्स्टलाही काम करण्याचे निर्देश आहेत.
राज्यासह देशभरातील शाळांची संपूर्ण माहिती यूडायस प्रणालीत भरण्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत असली तरी अद्यापही महाराष्ट्रातील ४ लाख ९८ हजार ८८८ विद्यार्थ्यांची माहिती शाळांनी भरलेलीच नाही. या शैक्षणिक सत्राची माहिती भरण्याची सुविधा ३१ डिसेंबरनंतर बंद केली जाणार आहे. त्यात विद्यार्थ्यांची कमी संख्या नोंदविली गेल्यास समग्र शिक्षातून मिळणाऱ्या निधीतही कपात होणार आहे. त्यामुळे माहिती न भरणाऱ्या संबंधितांवर प्रशासकीय कारवाई करण्याची तंबीही शिक्षण संचालकांनी २८ डिसेंबरच्या आदेशात दिली आहे. शनिवारी आणि रविवारीही उपसंचालक तसेच शिक्षणाधिकाऱ्यांनी यूडायसच्या कामाचा आढावा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे शिक्षकांना ३० आणि ३१ डिसेंबर रोजी यूडायसमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरण्याचे काम करावे लागणार आहे. अन्यथा निधी कपातीसोबतच पुढच्या सत्रातील संचमान्यतेवरही विपरित परिणाम होणार आहे.
यूडायसवरील सध्यस्थिती- राज्यातील शाळा : १,०८,३२६- एकूण विद्यार्थी : २,०८,७६,६२५- यूडायसमध्ये नोंदवलेले विद्यार्थी : २,०३,७७,७३७- अद्याप नोंद न झालेले विद्यार्थी : ४,९८,८८८
बाॅक्सकोणत्या शाळांचे किती विद्यार्थी प्रलंबित- शासकीय शाळा : ७५,१०३- अनुदानित शाळा : १,५५,४२३- विनाअनुदानित : ३८,७८५- स्वयंअर्थसहायित : २,२३,४४०- अनधिकृत शाळा : ६,१३७
यूडायसची माहिती भरण्याचे काम अंतिम टप्प्यातच आहे. दोन-चार टक्के काम शिल्लक आहे. त्यासाठी संबंधित शाळांसाठी तालुका, केंद्रस्तरावर कॅम्प लावून दोन दिवसात माहिती भरून घेणार आहोत. त्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेतली जाईल.- डाॅ. जयश्री राऊत, माध्यमिक शिक्षणाधिकारी, यवतमाळ