खेड्यातील सिमेंट काँक्रीटचा रस्ता हा केवळ सहा-आठ महिन्यांतच उखडला जात असून खड्डे पडत असलेले दिसते, तर पांदण रस्तेही एकाच वर्षात जैसे थे झालेले आहेत. या ठेकेदारांचे राजकीय हितसंबंध असून प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दबाव आणून आपली कामे करून घेत असल्याचे दिसते. अनेक राजकीय पक्षांतील कार्यकर्ते या कामात गुंतल्याने पक्ष पुढाऱ्यांना कार्यकर्ते सांभाळण्यासाठी व भविष्यकालीन राजकीय वाटचालीसाठी त्यांना कामे मिळवून देणे आदी प्रकार करावे लागतात. मात्र अनेक ठेकेदार कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष देत नाहीत. अनेकांना काम होईपर्यंत टक्केवारी द्यावी लागते, असे हे लोक खासगीत बोलतात. अनेक गावांतील सिमेंट रोड अल्पावधीतच फुटलेले आहेत. कामे घेण्यासाठी या लोकांत स्पर्धा लागलेली आहे. या प्रकारावर कुणाचेही नियंत्रण नसल्याने निकृष्ट कामेच होताना दिसतात. तक्रारी झाल्या तरी तक्रारकर्त्याचे समाधान केले जात नाही. विशेष म्हणजे ही कामे मिळविताना त्या कामाचे तांत्रिक ज्ञान संबंधितांकडे असावे लागते. तेही ज्ञान संबंधिताकडे दिसून येत नाही. काही गावांतील सरपंच, उपसरपंच व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांतील बहुतांश पधाधिकारीच कामे मिळवून आपली संपत्ती वाढवीत असल्याचे दिसत आहे. या लोकांविषयी नागरिकांत प्रचंड रोष दिसून येत आहे. कामे कोण मिळवितो हा प्रश्न नसून कामे योग्य झाली पाहिजेत, ही जनतेची मागणी आहे.
झरी तालुक्यात लोकप्रतिनिधीच बनले ठेकेदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 4:40 AM