यवतमाळ : ताणतणावातून मुक्त होत शासकीय कर्मचाऱ्यांनी कुटुंबात वेळ घालवत पर्यटन करावे, या उदात्त हेतूने शासनाने प्रवास रजा सवलत योजना सुरू केली. मात्र प्रवास दुसरीकडे अथवा प्रवासाला न जाताच या योजनेतून देयके काढण्याचा प्रकार येथील जिल्हा परिषदेसह सर्वच विभागात सुरू असल्याची ओरड दबक्या आवाजात ऐकायला मिळत आहे. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या या योजनेचा लाभ दर चार वर्षातून एकदा प्रत्येक कर्मचाऱ्याला त्याच्या कुटुंबासासाठी मिळतो. पर्यटनासाठी गेल्यानंतर लागणारे प्रवास भाडे, निवासासाठी होणारा खर्च सदर कर्मचाऱ्याला मिळतो. शिवाय रजाही दिली जाते. दर चार वर्षांनी या योजनेचा लाभ बहुतांश कर्मचारी नित्यनेमाने उचलतात. दरवर्षी लेखा विभागाकडे सादर होणाऱ्या देयकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ‘उभादांडा’ हे टोकावरचे पर्यटन क्षेत्रच दाखविल्या जाते. वास्तविक उभादांडा येथे पर्यटनासाठी गेल्याचे दर्शवून देयक काढणाऱ्यांना तेथे नेमके काय पाहिले हे सांगणेही कठीण आहे. यावरून या योजनेचा लाभ कुठल्या पद्धतीने घेतला जात असावा हे दिसून येते. पती-पत्नी आणि दोन मुले यांच्यासाठी या योजनेतून प्रवास खर्च दिला जातो. जिल्ह्यातील बहुतांश शासकीय कर्मचारी रेल्वे व्दारे हा प्रवास केल्याचे दर्शवितात. त्यासाठी यवतमाळ ते धामणगाव तेथून कोल्हापूर, त्यानंतर सावंतवाडी येथून थेट उभादांडा या पर्यटनस्थळी जाऊन आल्याचे रेकार्ड हे कर्मचारी देतात. त्यासाठी हजारो रुपयांचे देयकही सादर करतात. मात्र या गंभीर बाबीकडे कुणाचेच लक्ष नाही. संपूर्ण महाराष्ट्रात केवळ उभादांडा हे एकच पर्यटनस्थळ पाहण्यासारखे आहे का, असा प्रश्न कर्मचाऱ्यांची देयके पाहून उपस्थित होतो. यासंदर्भात एका कर्मचाऱ्याला खासगित विचारणा केली असता त्याने उभादांडा हे अगदी टोकावरचे क्षेत्र आहे. त्यामुळे देयक मोठ्या प्रमाणात काढता येते. या हेतूनेच बहुतांश कर्मचारी उभादांडा येथे जाऊन आल्याचे दर्शवीत असल्याचे सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हा परिषद कर्मचारी करतात ‘उभादांडा’ वारी
By admin | Published: January 20, 2015 10:43 PM