यवतमाळ : कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून सर्वच कार्यक्रमांना ब्रेक लागला. सभा, बैठकांनाही बंदी घालण्यात आली. त्यामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभाही ऑफलाईन होऊ शकली नाही. आता सदस्यांना पुढील महिन्यात होणाऱ्या सर्वसाधारण सभेची उत्सुकता लागली आहे.
कोरोनामुळे आत्तापर्यंत जिल्हा परिषदेच्या बहुतांश सभा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या. त्यावर विरोधकांनी आक्षेप घेत जवळपास प्रत्येक सभेत आकांडतांडव केले. ऑफलाईन सभेची मागणी लावून धरली. मात्र, शासन निर्णयानुसार प्रशासनाला ऑफलाईन सभा घेणे शक्य झाले नाही. आता कोरोना बऱ्यापैकी नियंत्रणात आला आहे. अनेक नियमांमध्ये सूट दिली जात आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची पुढील सर्वसाधारण सभाही ऑफलाईन घेण्याच्या दृष्टीने पदाधिकारी व प्रशासनाने हालचाल सुरू केली आहे. त्या अनुषंगाने गुरुवारी चाचपणी करण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी गुरुवारी सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत ऑफलाईन सभा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. सर्वच गटनेत्यांनी ऑफलाईन सभेची मागणी लावून धरली. आता जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन ऑफलाईन सभेला परवानगी मिळविण्याबाबत हालचाल सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सदस्यांनाही सप्टेंबर महिन्यात होऊ घातलेली सर्वसाधारण सभा ऑनलाईन होते की, ऑफलाईन, याबाबत उत्सुकता लागली आहे. येत्या काही दिवसांत याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
बॉक्स
गुरुवार ठरला बैठक वार
कोरोना काही प्रमाणात कमी होताच जिल्हा परिषदेत पुन्हा चहलपहल सुरू झाली आहे. गुरुवार तर बैठक वार ठरला. या एकाच दिवशी तब्बल चार विषय समित्यांची बैठक घेण्यात आली. बांधकाम, अर्थ, आरोग्य आणि शिक्षण विभागाची बैठक गुरुवारी पार पडली. त्यामुळे वास्तूत गर्दी दिसून आली.