जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला महागाव पंचायत समितीचा आढावा.
वाकोडी येथील ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे दिले निर्देश.
तालुक्यातील विविध विषयावर झाली चर्चा
जिल्हा परिषद अध्यक्षांनी घेतला महागावात आढावा
विविध विषयावर चर्चा : वाकोडी येथील ग्रामसेवकांवर कारवाईचे निर्देश
(फोटो)
महागाव : कारोनाकाळात आरोग्य विभागाने काय कामगिरी बजावली, तालुक्यात कोण कोणत्या गावात लसीकरणाला प्रतिसाद मिळाला यासह विविध विषयांवर जिल्हा परिषद अध्यक्ष कालिंदा पवार यांनी मंगळवारी आढावा सभा घेतली. अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर धरले.
येथील तहसीलच्या प्रशासकीय इमारतीत ही आढावा बैठक झाली. जि. प. सदस्य व पं. स. सदस्यांनी वाकोडी येथील ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीला उपस्थित राहत नाहीत, गावातील नागरिकांना दाखले व माहिती देणे, योजनांचे अर्ज दाखल करून घेत नाहीत, मार्च महिन्यापासून गावात फिरकले नाहीत, अशी तक्रार केली. त्यावर जि. प. अध्यक्ष पवार यांनी चौकशी करून ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश दिले. वडद येथील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जब्बार पठाण यांनी सांगितले. पंचायत विभागाकडून ग्रामपंचायतीकडील कर वसुलीचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. ग्रामपंचायत कर वसुली संदर्भात वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याबाबत गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड यांना निर्देश दिले. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना सॅनेटरी नॅपकीनची विल्हेवाट लावण्यासाठी प्रती ग्रामपंचायत एक याप्रमाणे सॅनेटरी नॅपकीन इन्सीनेटर मशिन जिल्हा स्तरावरून पुरविण्यात आल्या. सदरच्या मशीन कार्यान्वयित नसल्याबाबत सभेत सांगण्यात आले. मशिन पुरवठा करताना स्थानिक सरंपच, जि. प. व पं. स. सदस्यांना विश्वासात घेतले नाही, अशी तक्रार यावेळी करण्यात आली. याबाबतची चौकशी करून अहवाल सादर करण्याबाबत गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश दिले. तसेच नरेगा कामात शेतकऱ्यांची अडवणूक करीत असेल तर अशा कर्मचाऱ्यांची गय केली जाणार नाही, अशी तंबी अध्यक्षांनी दिली. यासह बांधकाम, घरकुल, बालविकास, आरोग्य, पाणी पुरवठा, शिक्षण इत्यादी विषयाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
यावेळी बांधकाम व अर्थ सभापती राम देवसरकर, शिक्षण व आरोग्य सभापती श्रीधर मोहोड, पंचायत समिती सभापती अनिता चव्हाण, अशोक जाधव, वर्षा भवरे, जि. प. सदस्य विलास भुसारे, उपसभापती रामचंद्र तंबाखे, पंचायत समिती सदस्य शिवाजीराव देशमुख, माजी सभापती गजानन कांबळे, अर्जुन राठोड, उपमुख्य कार्यकारी विशाल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. पी. एस. चव्हाण, कार्यकारी अभियंता बांधकाम व सिंचन भूमेश दमाहे, गटविकास अधिकारी मयूर अंदेलवाड यांची उपस्थिती होती.
130721\1922-img-20210713-wa0034.jpg
महागाव तहसीलच्या प्रशासकीय इमारती मध्ये आयोजित आढावा सभेला संबोधित करताना जिल्हा परिषद अध्यक्ष कालींदा ताई पवार