दिग्रस : बांधकामाला केवळ १८ वर्षे झालेल्या जिल्हा परिषद शाळेचा स्लॅब अचानक कोसळला. ही गंभीर घटना तालुक्यातील धानोरा बुद्रूक गावात बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तालुक्यातील धानोरा बुद्रूक येथे सन २००५ मध्ये जिल्हा परिषद शाळेची इमारत बांधण्यात आली होती. केवळ १८ वर्षातच शाळेचा स्लॅब कोसळल्यामुळे बांधकामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. प्रशासनाने अतिशय निकृष्ट दर्जाचे बांधकाम केल्यामुळेच ही इमारत कोसळल्याची संतप्त प्रतिक्रिया गावकऱ्यांमधून उमटत आहे. इमारत उभी करून केवळ १८ वर्ष झाली आणि १८ वर्षातच शाळेचा स्लॅब कोसळणे ही लाजिरवाणी बाब घडली. ही शाळेची इमारत जीर्ण झाल्याने बाजूलाच शाळेची नवीन इमारत उभारण्यात आली. परंतु जीर्ण झालेली शाळेची इमारत का पाडली नाही? हा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
सध्या शाळेला उन्हाळी सुटी लागलेली आहे. परंतु, रखरखत्या उन्हामध्ये गावातील मुले, नागरिक या शाळेच्या स्लॅबखाली बसून असतात. दुपारच्या वेळेस लहान मुले येथे नेहमी खेळतात. परंतु सुदैवाने घटनेच्या वेळी कोणीही तेथे नसल्याने जीवितहानी टळली. अन्यथा मोठा अनर्थ घडला असता. जीर्ण इमारतीच्या निर्लेखनाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. ही इमारत यापूर्वीच प्रशासनाने पाडायला पाहिजे होती. परंतु त्याबाबत पावले का उचलली गेली नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या स्लॅबखाली एखाद्याचा जीव गेला असता तर याला जबाबदार कोण? अशा संतप्त प्रतिक्रिया जनतेतून उमटत आहे. इमारत निर्लेखनाबाबत संबंधित मुख्याध्यापकाने पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार केला का, केला असेल तर गटशिक्षणाधिकारी यांनी जीर्ण शाळा का पाडली नाही, असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणात संबंधिताची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.