दिग्रस (यवतमाळ) : संभाव्य नगरपरिषद, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दोन पक्ष आणि एका आघाडीत संघर्ष रंगण्याची चिन्हे आहे. सोबतच पालिकेच्या निवडणुकीत अपक्षही आव्हान देणार आहे.
आमदार संजय राठोड, परिवर्तन विकास आघाडीचे प्रमुख माजी राज्यमंत्री संजय देशमुख, अपक्ष मो. जावेद पहेलवान आदींनी पालिका निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. गेल्या १५ वर्षात आमदार राठोड यांनी केलेल्या विकास कामामुळे शिवसेना घराघरात पोहोचली आहे. पालिकेत गेल्यावेळी काँग्रेसचेही दोन नगरसेवक विजयी झाले होते. ते सेनेत गेले. पाच वर्षांपूर्वी संजय देशमुख यांची पालिकेवर सत्ता होती. सहकार क्षेत्रावरही त्यांची पकड आहे.
पालिकेच्या राजकारणात अपक्ष मो. जावेद पहेलवान मजबूत आहे. आता भाजपनेही तयारी सुरू केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेतेही संभाव्य निवडणुकीवर डोळा ठेवून जनसंपर्क वाढवित आहे. चार पक्ष, एक आघाडी आणि अपक्षामध्ये सामना रंगण्याची शक्यता आहे. याशिवाय इतर पक्ष व आघाड्यासुद्धा पालिका व इतर निवडणुकीत उतरणार आहे.
असे आहे तालुक्याचे राजकीय चित्र...
दिग्रस तालुक्यात शिवसेना आणि परिवर्तन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. बहुतांश सोसायट्या आणि संस्था त्यांच्या ताब्यात आहे. काही वर्षांपासून भाजपनेही हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही वर्चस्व निर्माण करण्यासाठी हालचाल सुरू केली आहे. याशिवाय पालिका राजकारणातील अपक्षांनीही आपली ताकद दाखवून दिली आहे. येत्या निवडणुकीकडे लक्ष आहे.
गटबाजीभोवती फिरतेय राजकारण
तालुक्यात शिवसेना आणि परिवर्तन विकास आघाडीशिवाय गेल्या पाच वर्षात पालिकेवर अपक्षाने वर्चस्व ठेवले. पाच वर्षांपूर्वी परिवर्तन विकास आघाडीचे पालिकेवर वर्चस्व होते. नंतर अपक्ष मो. जावेद पहेलवान यांनी आपल्यासह कुटुंबातील चार जणांना पालिकेत निवडून आणले. दुसरीकडे काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेला मिळाले. काँग्रेसमध्ये गटबाजी वाढली. येत्या पालिका निवडणुकीतही गटबाजीची चिन्हे आहे.
सर्वांचा पक्षबांधणीवर भर, अपक्षही जनतेच्या संपर्कात
शिवसेना, भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि परिवर्तन विकास आघाडीने कार्यकर्ते जोडण्यावर भर दिला आहे. अपक्ष मो. जावेद पहेलवानही जनतेच्या संपर्कात आहे. गेली पाच वर्ष त्यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या. मो. जावेद पहेलवान यांनी नुकतीच माजी राज्यमंत्री संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यामुळे परिवर्तन आणि अपक्ष एकत्र येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. भाजपने डाॅ. विवेक भास्करवार यांना पक्षात घेऊन कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण केले आहे. इतर पक्षही पक्षबांधणीवर भर देत आहे.
माणिकराव ठाकरे व राहुल ठाकरे यांच्या मार्गदर्शनात तालुक्यात काँग्रेस बळकट आणि एकसंघ आहे. दर महिन्याला बैठक घेतली जाते. डिजिटल सदस्य नोंदणी सुरू आहे. त्याला प्रतिसाद मिळत आहे.
- शंकर जाधव, काँग्रेस तालुकाध्यक्ष, दिग्रस
वरिष्ठांच्या मार्गदर्शनात शहर व तालुक्यात पक्षबांधणी सुरू आहे. जनतेच्या विविध समस्या सोडविण्यासाठी कार्यकर्ते प्रयत्नशील आहे. विविध ठिकाणी शाखा स्थापन केल्या जात आहे.
- मंगेश वानखडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष, दिग्रस
शहरात २७ आणि ग्रामीण भागात ३५ गावांमध्ये शाखा स्थापन केल्या. जनतेच्या हिताची आंदोलने केली. तालुक्यात पक्षबांधणी सुरू आहे. आगामी निवडणुकीत विजयाची अपेक्षा आहे.
- रवींद्र अरगडे, भाजप तालुकाध्यक्ष, दिग्रस
आमदार संजय राठोड यांच्या मार्गदर्शनात गावपातळीवर शिवसंपर्क अभियान राबविले जात आहे. आमदार राठोड यांनी अनेक विकास कामे केली. त्यामुळे पक्ष मजबूत झाला आहे.
- उत्तमराव ठवकर, शिवसेना तालुका प्रमुख, दिग्रस