'भारत जोडो यात्रेने देशात चैतन्य, महाराष्ट्रात ३८१ किमीचा प्रवास'
By सुदाम देशमुख | Published: October 15, 2022 02:48 PM2022-10-15T14:48:10+5:302022-10-15T14:49:12+5:30
सात सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे.
घारगाव( जि. अहमदनगर): काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून सुरुवात होणार आहे. या यात्रेचा राज्यातील प्रवास नांदेड जिल्ह्यातील देलगूर तालुक्यातून होणार असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील घारगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
सात सप्टेंबर रोजी सुरु झालेली ‘भारत जोडो’ पदयात्रा केरळ, तामिळनाडू असा प्रवास करत आता कर्नाटक मध्ये आहे. या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. यात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांची संख्या पन्नास हजारांपासून दीड ते दोन लाखांपर्यंत आहे. देशात चैतण्यमय वातावरण आहे. आजपर्यंत तीन हजार पाचशे साठ किलोमीटरची पदयात्रा जगाच्या पाठीवर कोणीही काढलेली नाही. महाराष्ट्रात साधारणतः सहा नोव्हेंबर पासून यात्रा सुरु होणार असून नांदेड, हिंगोली,वाशीम,अकोला,बुलढाणा असा ३८१ किलोमीटरचा प्रवास आहे.
२०१४ पासून देशात ज्या पद्धतीची राजवट सुरु आहे, त्यामुळे लोकशाही, स्वायत्त संस्था धोक्यात आलेल्या आहेत. याशिवाय राज्यघटना,मुलभूत तत्व,आपल्या मतांचा अधिकार हे पुढच्या काळात राहील ना राहील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. विकासाची कामे ठप्प झालेली आहेत. बिघडलेली अर्थव्यवस्था,महागाई,प्रचंड बेरोजगारी या महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देण्याचे सोडून अन्य गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जात आहे. माणसा-माणसांत,समाजात भेद निर्माण करायचा, त्यातून मते मिळवून सत्तेवर राहण्याचा हा प्रयोग चालला आहे. अशी मोदी सरकारवर टीका करत या सर्व गोष्टींच्या विरुद्ध देशाला एकजूट करण्यासाठी ही यात्रा असल्याचे माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे विधिमंडळ नेते थोरात यांनी संवाद साधताना सांगितले.