राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2024 05:24 AM2024-09-19T05:24:20+5:302024-09-19T05:24:58+5:30
काँग्रेस आज गुरुवारी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार आहे.
अमरावती : लोकसभेचे विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या जिभेला चटके दिले पाहिजेत, असे आक्षेपार्ह वक्तव्य भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी केले. एका वृत्त वाहिनीवर बोलताना बोंडे यांनी हे विधान केल्याची माहिती व्हायरल झाल्यानंतर बुधवारी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर येथील राजापेठ पोलिसांनी बोंडे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल केला. काँग्रेस गुरुवारी रस्त्यावर उतरून राज्यभर आंदोलन करणार आहे.
बोंडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, या मागणीसाठी खासदार बळवंत वानखडे व आ. यशोमती ठाकूर यांनी पोलिस आयुक्त कार्यालयात चार तास ठिय्या दिला. त्यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष हरिश ऊर्फ भैया मुरलीधर पवार यांनी राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली. युवक काँग्रेसने बोंडे यांच्या राजापेठस्थित घरासमोर निदर्शने केली.
राजापेठ ठाण्यातील उपनिरीक्षक प्रकाश जगताप यांनी दुपारी भादंवि कलम १९२ (दंगल घडविण्याच्या हेतूने चिथावणी देणे), ३५१(२)(गुन्हेगारी धमकी) व ३५६ (२)(मानहानी) अन्वये गुन्हा नोंदविला. गांधी यांच्याबाबत द्वेष निर्माण होईल, त्यांच्यावर हल्ला व्हावा व दंगली घडाव्यात, अशा हेतूने डॉ. बोंडे यांनी लाेकांना प्रोत्साहित केल्याचे पवार यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
राहुल गांधींवर बोलण्याची बोंडेची लायकी नाही, ते काही विद्वान नाहीत, त्यांना मंत्रिपद, खासदारकी कशी मिळाली हे आम्हाला माहीत आहे, योग्य वेळ आल्यावर तेही जाहीर करू. काँग्रेस पक्ष गुरुवारी राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करेल.
- नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष काँग्रेस
भाजप आणि शिंदेसेनेचे नेते दररोज महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला काळिमा फासत आहेत आणि त्यांचे नेते एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या वाचाळवीरांना मूक पाठिंबा देत आहेत. संजय गायकवाड, अनिल बोंडेंना तर जनता शिक्षा देईलच; पण, यांच्या कर्माची फळे यांना पाठीशी घालणाऱ्या नेत्यांनाही भोगावी लागणार आहेत.
- बाळासाहेब थोरात, काँग्रेस विधीमंडळ पक्षाचे नेते