आज अजित पवारांच्या स्टेजवर जाणार; काँग्रेसच्या निलंबनानंतर आमदार सुलभा खोडकेंची घोषणा
By गणेश वासनिक | Published: October 13, 2024 09:32 AM2024-10-13T09:32:36+5:302024-10-13T09:32:55+5:30
आमदार खोडके या २०२४ पासून निरंतर विविध निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर खोडके यांनी शुक्रवारी पत्र परिषदेतून काँग्रेस माझा अपमान करून डावलत असल्याचा आरोप केला होता.
अमरावती : पक्ष विरोधी कारवाया केल्याप्रकरणी अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांना काँग्रेस पक्षातून ६ वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. शनिवारी निलंबनाचे आदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी काढले. यानंतर खोडके यांनी प्रतिक्रिया दिली असून अमरावतीकरांसमोर रविवारी माझी भूमिका स्पष्ट करणार असल्याचे म्हटले आहे.
आमदार खोडके या २०२४ पासून निरंतर विविध निवडणुकीत पक्ष विरोधी कारवाया करत असल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. तर खोडके यांनी शुक्रवारी पत्र परिषदेतून काँग्रेस माझा अपमान करून डावलत असल्याचा आरोप केला होता.
2019 मध्ये काँग्रेस पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे विशेष आभार मानते. अजित पवारांनी मला भरपूर निधी दिला. त्यामुळे मी अजित पवार यांचा अमरावतीत सत्कार करणार आहे. रविवारी माझी राजकीय भूमिका ठरवणार आहे. मला काँग्रेसच्या बैठकीत बोलावले गेले नाही. सातत्याने मला डावलण्यात आले होते. काँग्रेसचे स्थानिक नेते नाना पटोले यांचे कान भरत होते. अजित पवार यांच्या कार्यक्रमाच्या स्टेजवर मी जाणार आहे, असे खोडके म्हणाल्या.
अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडीचे सरकार गेले, तर काही दिवसांनी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली नि महायुतीत सामील झाले. तसेही सत्ता अन् राष्ट्रवादी काँग्रेस हे समीकरण फार जुने आहे. महायुतीत अजित पवार उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले. तेव्हापासून काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांची राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या गटासोबत अधिक सलगी वाढली. अमरावती मतदारसंघाच्या विविध विकासकामांसाठी निधी असो वा शासन स्तरावर प्रलंबित समस्या असो त्या प्राध्यान्याने सोडविण्यासाठी सुलभाताईंनी दादांचीच मदत घेतली. मध्यंतरी राज्यसभा, त्यानंतर विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांवर 'क्रॉस व्होटिंग' केल्याचा ठपका ठेवण्यात आला. काँग्रेसच्या श्रेष्ठींनी ज्या पाच आमदारांनी दगाफटका केला त्यांना विधानसभेची उमेदवारी नाहीच, असा निर्णय घेतला. त्यात सुलभा यांचेही नाव होते.
त्यानंतर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या प्रचारात त्या कुठेच दिसल्या नाही. एकंदरीत आमदार खोडके यांची वाटचाल अजित पवार गटाकडे आहे. महायुतीतून शिंदेसेनेनेही अमरावतीवर दावा केला आहे. किंबहुना अजित पवार पक्षाला अमरावतीची जागा सुटल्यास भाजप, शिंदेसेना कोणती भूमिका घेणार, याकडे अनेकांचा नजरा लागणार आहे.