जनसंपर्क, उद्योग, रोजगार आदी मुद्दे ठरले प्रभावी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 05:20 PM2024-06-05T17:20:35+5:302024-06-05T17:21:23+5:30
Bhandara : शेड्युल कास्टची मते काँग्रेसच्या पत्थ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा :भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने तब्बल २५ वर्षांनंतर मुसंडी मारत विजयी मिळविला. काँग्रेसचे उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांनी भाजपचे उमेदवार खा. सुनील मेंढे यांचा ३४ हजार मतांनी पराभव केला. मेंढे यांच्या पराभवानंतर त्यांच्या पराभवाची नेमकी कारणे काय याची चर्चा होऊ लागली आहे, तर खा. सुनील मेंढे यांचा मागील पाच वर्षांत मतदारसंघात असलेला जनसंपर्काचा अभाव, मतदारांमध्ये असलेली नाराजी, उद्योग व रोजगाराचा अभाव, रखडलेले सिंचन प्रकल्प आणि संविधान धोक्यात आल्याचा मुद्दा या निवडणुकीत प्रभावी ठरला. हेच मुद्दे भाजप उमेदवाराच्या पराभवाला कारणीभूत ठरले.
भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) शिंदे सेना यांनी महायुती करून ही निवडणूक लढविली. या मतदारसंघातील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदे सेनेच्या नेते, पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीत भाजप उमेदवाराच्या विजयासाठी भरपूर मेहनत घेतली, तर खा. प्रफुल्ल पटेल यांनी मतदारसंघात तळ ठोकून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला. पण, याचा फारसा प्रभाव झाला नाही, तर महायुतीचे समीकरण यात सहभागी घटक पक्षांनाच पचनी पडले नाही. त्याचा परिणामसुद्धा प्रत्यक्ष मतदानादरम्यान दिसून आला, तर दुसरीकडे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या निवडणुकीचे संपूर्ण नियोजन स्वतः करून सर्व सूत्रे स्वतःकडे ठेवली. प्रचारांपासून ते सभांचे नियोजन त्यांनीच केले, तर शेड्युल कास्ट मतांचा काँग्रेसकडे असलेला कौल महत्पूर्ण ठरला.
मतदारसंघाचा इतिहास कायम
मागील २५ वर्षांचा या मतदारसंघाचा इतिहास पाहिल्यास या मतदारसंघातून मतदारांनी सलग दुसऱ्यांदा कोणत्याच उमेदवाराला संधी दिली नाही.
प्रफुल्ल पटेल, केशवराव पारधी वगळता यांचा अपवाद वगळता या मतदारसंघातून सलग संधी कुणालाही मिळाली नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा हा मतदारसंघ गृहक्षेत्र असून, त्यांची या मतदारसंघावर बऱ्यापैकी पकड आहे. ती अद्यापही कायम असल्याचे या मतदारसंघातील निकालावरून सिद्ध झाले.
हे मुद्दे ठरले भारी
१) भाजपचे खा. सुनील मेंढे यांना मतदारसंघात नाराजी असताना दुसऱ्यांदा दिलेली संधी, पाच वर्षांत न झालेली विकासकामे.
२) ही निवडणूक महायुती करून लढविण्यात आली. पण, हे समीकरण महायुतीत सहभागी घटक पक्षातील स्थानिक नेत्यांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे मतदानादरम्यान प्रभाव दिसला.
३) शेड्युल कास्टची गठ्ठा मते काँग्रेसच्या पत्त्यावर पडली. काँग्रेसने निवडणुकीत चुका टाळत केलेले सूक्ष्म नियोजन है मुद्दे मुद्दे भारी ठरले.
हे मुद्दे ठरले फ्लॉप
१) विकासाचा मुद्दा : या निवडणुकीत भाजप उमेदवाराने विकास आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना यावर फोकस करीत मते मागितली. पण, मतदारांनी हे दोन्ही मुद्दे नाकारले.
२)मोदींभोवती निवडणूक केंद्रित: या मतदारसंघातील उमेदवार भाजप उमेदवार सुनील मेंढे यांच्याबद्दलची असलेली नाराजी ओळखत भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतांचा जोगावा मागितला. पण, त्यालादेखील मतदारांनी पूर्णपणे नाकारले.
3) केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विकास योजना यावर भाजपने निवडणुकीत लक्ष केंद्रित केले, पण हे मुद्दे निवडणुकीत पूर्णपणे गौण ठरले.
४) पदाधिकारी कार्यकर्त्यांची ४ बांधणी करण्यात सुनील मेंढे यांना आलेले अपयश व जनसंपर्काचा अभाव