Karnataka Election 2018 : सत्तेचा हिशेब जुळवणारे सिद्धारामय्या हे नारायण राणेंपेक्षा वेगळे कसे?
By तुळशीदास भोईटे | Published: May 2, 2018 08:41 PM2018-05-02T20:41:38+5:302018-05-03T07:16:00+5:30
कर्नाटकातील राजकीय वातावरण आता तापू लागले आहे. कर्नाटकच्या लढाईतील मुख्य राजकीय शिलेदारांची ओळख करुन देताना सुरुवात विद्यमान मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे सरसेनापती सिद्धारामय्या यांच्यापासून...
"ते सिद्धारामय्या नाहीत तर सिधारुपय्या आहेत..." बोचरी टीका...तीही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून झाली. कोणी काय, तर कोणी काय...सातत्याने टीका होत असूनही, विरोध विरोधकांकडूनच नाही तर स्वत:च्याच पक्षातून होत असूनही कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्रामातील सरसेनापती सिद्धारामय्या यांनी आपल्या आक्रमक डावपेचांमध्ये, वागण्या-बोलण्यात कसलाही बदल केलेला नाही. ते बारा मेची लढाई जिंकायचीच या आवेशाने तडफेने लढत आहेत. त्याचे कारण त्यांना ओळखणारे सांगतात...ते सिद्धारामय्या आहेत...राजकारणाचा सरळसोट...सिधा हिशेब जेवढा त्यांना जुळवता येतो तेवढा सध्याच्या कर्नाटकी राजकारणात खूपच कमी नेत्यांना जमतो. कर्नाटकच्या रणसंग्रामातील प्रमुख नेत्यांचा आढावा घेताना त्यासाठीच सुरुवात करायची ठरवली ती सिद्धारामय्या यांच्यापासूनच.
सिद्धारामय्यांचा प्रवास सुरु झाला तो म्हैसूरमधील एका गावात गुरं चारण्यापासून. आपल्या धनगर समाजासारखा त्यांचा समाज. मात्र त्यांचे मन त्या माळरानात, कुरणात रमणं शक्य नव्हतं. कारण गुरं चारताना डोळ्यासमोर होती मोठी स्वप्नं. त्यांनी कुरणांऐवजी शाळेकडे मोर्चा वळवला. बी.एसी. झाल्यानंतर एल.एल.बी.ची पदवी मिळवली. मुळात त्यांच्या मनात राजकारणच असावे. त्यामुळे न्यायालयातील वकिलीऐवजी ते राजकीय वकिलीत गेले. पहिली निवडणूक लढवली ती १९८३मध्ये. त्यांच्या चामुंडेश्वरी मतदारसंघातून. सर्वांचे हिशेब चुकवत निवडूनही आले. तेही लोकदलाच्या तिकिटावर. तेथेच त्यांचे हिशेब खरे ठरू लागले. त्यांनी व्यवस्थित हिशेब जुळवत कर्नाटकी राजकारणावर पकड मिळवणारे पाऊल उचलले. कन्नड कावलू समितीचे अध्यक्ष झाले. ही समिती कन्नड राज्यभाषेच्या अंमलबजावणीसाठी जागल्याची भूमिका बजावते. तेथे त्यांचे पुढचे पाऊल पडले. कन्नड भाषिकांच्या मनात स्थान मिळवणारे.
त्यानंतर १९८८मध्ये जनता पार्टीत आणि त्यानंतर आपोआपच जनता दलात दाखल झाले. १९९४मध्ये एचके देवेगौडा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात सिद्धारामय्या अर्थमंत्री झाले. त्यानंतर मग त्यांनी देवेगौडानाच आपला नेता मानून आपलं सत्तेच्या राजकारणातील आपले महत्व वाढवत नेले. त्याचा फायदा झाला. १९९६ला अनपेक्षितपणे देवेगौडांना पंतप्रधानपदाची लॉटरी लागली तेव्हा त्यांनी कर्नाटकाची गादी जे.एच.पटेल यांना गादी सोपवली. आपल्या विश्वासू सिद्धारामय्यांना त्यांनी उपमुख्यमंत्रीपद बहाल केले.
सिद्धारामय्यांचा राजकीय हिशेबीपणा फायद्याचाच ठरत राहिला. १९९९मध्ये जनता दल फुटले. धर्मनिरपेक्ष आणि संयुक्त असे दोन तुकडे झाले. सिद्धारामय्या धर्मनिरपेक्ष गटासोबत राहिले. कारण कर्नाटकात प्रभाव असणारे देवेगौडा त्यागटाचे नेते होते. देवेगौडांनी त्यांना नव्या गटाचे प्रदेशाध्यक्ष बनवले. सिद्धारामय्यांची उंची आणखी वाढली. २००४मध्ये काँग्रेस आणि जनता दल धर्मनिरपेक्षचे आघाडी सरकार सत्तेवर आले. धरमसिंह मुख्यमंत्री झाले. तेव्हा जनता दलातर्फे सिद्धारामय्या उपमुख्यमंत्री झाले.
मात्र तेवढ्यावर समाधान मानतील ते सिद्धारामय्या कसले. त्यांनी स्वत:ची समीकरणे जुळवण्यास सुरुवात केली. देवेगौडा वोकल्लिंग समाजाचे. त्यांची ती मतपेढीच. त्यांच्या जोडीला सिद्धारामय्या यांनी कर्नाटकात क्रमांक तीनची लोकसंख्या असलेला आपला समाज जुळवला होता. मात्र नव्या समीकरणात ते वेगळीच चाल खेळले. अहिंदा या नावाने जाती-धर्म समूहांची मोट बांधली. अल्पसंख्यांक, मागासलेल्या जाती आणि दलित जाती समूह. त्यांची चाल ओळखून २००५मध्ये देवेगौडा यांनी त्यांची हकालपट्टी केली. सिद्धारामय्यांना बहुधा ही कारवाई पाहिजेच होती. ते काँग्रेसमध्ये गेले. त्यासाठी सोनिया गांधींच्या सभेचे मोठे व्यासपीठ निवडण्याचा हिशेबीपणा त्यांनी दाखवला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत चामुंडेश्वरी मतदारसंघातून ते निवडून आले. भाजपा-जनता दल एकत्र विरोधात असतानाही. मात्र पुढील निवडणुकीत त्यांनी मतदारसंघ बदलून वरुणा या वेगळ्या मतदारसंघाची निवड केली.
पुढे २०१३च्या निवडणुकीपूर्वी सिद्धारामय्यांनी हिशेबीपणाने खाणसम्राट रेड्डी बंधूंविरोधात लढा पुकारला. बेल्लारीच्या रेड्डींविरोधात पुकारलेला हा लढा भाजपाला अडचणीत आणणारा ठरला. त्यातच येदियुरप्पा बाहेर गेल्याने भाजपाची शक्ती खालावली होती. त्यामुळे काँग्रेसला सत्तेवर आणण्याचा हिशेब जुळला. सिद्धारामय्या मुख्यमंत्री झाले. २०१४च्या लाटेतही त्यांनी बरचसं वाचवलं. आता काँग्रेस अन्यत्र अडचणीत असताना त्यांनी पुन्हा एकदा आपला हिशेबीपणा दाखवला आहे. कर्नाटकच्या स्वतंत्र झेंड्यातून कन्नड अस्मिता कुरवाळली आहे. तर लिंगायतांना स्वतंत्र धर्माच्या शिफारशीच्या चालीतून येदियुरप्पांच्या समर्थक समाजातच घुसण्याचा प्रयत्न केला आहे.
आतापर्यंतच्या जनमत चाचण्यांमधून जे कौल समोर येत आहेत, त्यात काँग्रेसला पहिल्या क्रमांकावर, त्यानंतर भाजपा आणि शेवटी जनता दल आहे. मात्र स्पष्ट बहुमत कुणालाच मिळणार नसल्याने जनता दलाची मदत घेऊनच सत्तेचं समीकरण जुळवावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपा थेट जनता दल, देवेगौडा यांच्यावर टीका करणे टाळत आहे. मात्र त्याचवेळी सिद्धारामय्यांनी मात्र थेट जनता दलालाच लक्ष्य केले आहे. राहुल गांधींनाही त्यांनी जनता दलाला लक्ष्य करायला लावलं. "जनता दल भाजपाची बी टीम आहे" हा राहुल गांधींचा आरोप सिद्धारामय्यांच्या आग्रहातूनच. त्रिशंकू स्थिती उद्धवली तर ज्यांच्या मदतीची गरज लागेल त्यांनाच लक्ष्य करण्यामागेही त्यांचा स्पष्ट हिशेब आहे. जनता दल जी मते घेणार ती भाजपाविरोधी धर्मनिरपेक्ष मतेच. जनता दल चालले तर ती मते जास्त फुटणार म्हणजे काँग्रेसचीच मते फुटणार. नुकसान होणार. जनता दल वाढणे म्हणजे भाजपाचा फायदा. तसे नाही झाले तरी जेवढ्या जनता दलाच्या जागा जास्त तेवढा निकालानंतरची किंमत जास्त. तडजोडीला त्रास. त्यामुळेच धर्मनिरपेक्ष मतांना त्यांच्याकडे जाण्यापासून रोखण्यासाठीच भाजपाची बी टीमवाल्या आरोपाची चाल त्यांनी खेळली असावी.
अर्थात भाजपाही काही झोपलेली नाही. पंतप्रधानांनी राहुल गांधींचा बी टीमवाला आरोप हा माजी पंतप्रधान असणाऱ्या देवेगौडा यांचा अपमान असल्याचे विधान केले. निकालानंतरच्या परिस्थितीसाठीच्या जुळवणुकीसाठी पेरणीस सुरुवात केली. मात्र ते ओळखून सिद्धारामय्या यांनी आधीच हिशेब केल्याचे सांगितले जाते. त्यांनी देवेगौडांचे दुसरे चिरंजीव एचडी रेवण्णा यांना आपलसं केलेले आहे. त्यांच्या मतदारसंघातील प्रत्येक कामाला ते प्राधान्य देत असत. त्यांना ठाऊक आहे. देवेगौडा आज जरी भाजपाशी चुंबाचुंबी करु पाहणाऱ्या कुमारस्वामींवर जाहीर आगपाखड करत असले तरी वेळ येताच पुत्रप्रेमापोटी काहीही करतील याची त्यांना भीती वाटते. २००७ची आठवण ती भीती सार्थही ठरवते. २००४मध्ये जनता दल आणि काँग्रेसची आघाडी सत्तेत होती. २००७मध्ये कुमारस्वामी यांनी पक्षाच्या ५८पैकी ४६ आमदारांसह वेगळी वाट निवडली. भाजपाशी घरोबा करुन ४० महिन्यांपैकी २० महिने जनता दल आणि २० महिने भाजपा अशी सत्तेची वाटणी केली. देवेगौडांनी आता जसं आकांड-तांडव केलं तसंच तेव्हाही केलं. आता अमित शहांना कुमारस्वामी भेटल्याचा आरोप होताच त्यांनी हात तोडण्याची धमकी दिली. तेव्हा त्यांनी कुमारस्वामी समर्थक ४६ आमदारांना आपात्र ठरवण्याची शिफारस केली. त्यावेळी विधानसभेचे अध्यक्ष त्यांचेच समर्थक कृष्णा होते. त्यांनी आपल्याच नेत्याची शिफारस मानली नाही. पुढे देवेगौडांनी भूमिका बदलली. काँग्रेसवरच आपला पक्ष फोडण्याच्या कटाचा आरोप केला. कुमारस्वामीला पक्ष वाचवल्याबद्दल धन्यवाद दिले.
राजकीय हिशेब चांगलेच कळणाऱ्या सिद्धारामय्यांच्या लक्षात ते असावे. तेही तेव्हा काँग्रेसच्याबाजूने मैदानात होतेच. त्यामुळेच आता ते १२मेच्या लढाईपूर्वी देवेगौडांच्या जनता दलाबद्दल धर्मनिरपेक्ष मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करुन त्यांची रसद तोडू पाहत असावेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देवेगौडांना कुरवाळून कन्नड अस्मिता चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यामुळे पुन्हा सिद्धारामय्यांची धर्मनिरपेक्ष मतदारांच्या मनात देवेगौडांबद्दल, जनता दलाबद्दल संशय निर्माण करण्यास मदतच होण्याची शक्यता आहे.
तरीही धोका नको म्हणून सिद्धारामय्यांनी एक महत्वाचा डाव खेळल्याचंही दिसत आहे. काँग्रेस सत्तेवर आली तरी मीच मुख्यमंत्री असेन असे नाही, असे ते म्हणालेत. स्पष्टपणे त्रिशंकू अवस्था झाली तर आपल्यामुळे जनता दल अडून बसू नये यासाठीची ती चाल असावी हे स्पष्ट आहे. खरंतर निकालास वेळ आहे. पण त्याआधीच पुढच्या हिशेबात अडचणी नको, ही त्यांची रणनीती असावी. हेच सिद्धारामय्यांचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच खरंतर सातत्याने महत्वाकांक्षी राहणे, सत्ता मिळवू पाहणे, त्यासाठी स्वत:च्या पक्षाला सोडणे असे आपल्या नारायण राणेंशी साम्य असणारे राजकारण असूनही सिद्धारामय्या वेगळे ठरतात. ते आपल्या बाजूने परिस्थिती बदवणारे हिशेब करत चाल खेळतात. आताची लढाई काही सोपी नाही. लढाई स्थानिक येदियुरप्पा, देवेगौडा यांच्याशी नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्याशीही आहे. त्यामुळे त्यांचे हिशेब किती जुळतात आणि ते सत्तेचे नवे खाते खोलतात का ते कळेलच. पंधरा मेपर्यंत वाट पाहावी लागेल.