‘भारत जाेडाे’चा ७३वा दिवस महिलांचा, इंदिरा गांधींना केले अभिवादन; गावखेड्यांमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद
By निलेश जोशी | Published: November 20, 2022 01:19 PM2022-11-20T13:19:04+5:302022-11-20T13:19:39+5:30
पदयात्रा शनिवारी संतनगरीतून भेंडवळसाठी रवाना झाली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत केवळ महिलांनी मार्गक्रमण केले.
बुलढाणा : भारत जाेडाे पदयात्रेच्या ७३ व्या दिवशी नारी शक्तीचा प्रभाव दिसून आला. निमित्त हाेते माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे. या पदयात्रेचा महाराष्ट्रातील हा १३ वा दिवस आहे. जवळपास ८०० महिला भास्तनपर्यंत सहभागी झाल्या होत्या.
पदयात्रा शनिवारी संतनगरीतून भेंडवळसाठी रवाना झाली. इंदिरा गांधींच्या जयंतीनिमित्त यात्रेत केवळ महिलांनी मार्गक्रमण केले. शेगावपासून सहा किमी अंतरावर खेर्डी येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सकाळी शेगाव येथे इंदिरा गांधी यांना अभिवादन करून ही यात्रा पुढे रवाना झाली.
रेल्वे गेटसमोर अडकला यात्रेतील कंटेनरचा ताफा
शेगाव - भारत जोडो यात्रा जलंब गावातून बाहेर जात असताना यात्रेतील कंटेनर जलंब येथील मध्य रेल्वेच्या गेटसमोरील बॅरिकेड्समध्ये अडकला. प्रशासनाने धावाधाव करत जेसीबी बोलावून रस्ता खाेदून माेकळा केला. यासाठी अर्धा तास लागल्याने यात्रेतील वाहनांचा खोळंबा झाला होता. यात्रेसाेबत विविध साहित्यांचे कंटेनर आहेत. यात्रेसाेबत सकाळी कंटेनरचा ताफाही निघाला. जलंब रेल्वे गेटजवळ उच्च विद्युतवाहिनीच्या तारा असल्याने येथे बॅरिकेड्स लावले आहेत. चालकांच्या हे लक्षात आल्याने ताफा, इतर वाहने थांबवावी लागली.
पदयात्रींचा दिवस सुरू होतो पहाटे चार वाजता! -
शेगाव - ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी झालेल्या महाराष्ट्रातील यात्रींचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो. पहाटे पाचपासूनच यात्री यात्रेत सहभागी होतात. सकाळी यात्रा सुरू होण्यापूर्वीच यात्री नियोजनात व्यस्त हाेतात. त्यांच्या दुसऱ्या दिवशीच्या प्रवासाचे नियोजन तसेच व्यवस्थेबाबत सूचना त्यांना रात्रीच गटप्रमुखांकडून दिल्या जातात. सूचनेनुसारच दुसऱ्या दिवशीचे नियोजन ठरते. शनिवारी पहाटे ५ वाजता नियोजित स्थळापर्यंत यात्रेत सहभागी हाेणारी जनता शिस्तीने पोहोचली हाेती.
कुंचल्यातून रेखाटले इंदिरा गांधींचे चित्र -
शेगाव - भारत जोडो यात्रा मार्गावरील माटरगाव जवळील रस्त्यालगत इंदिरा गांधी व राष्ट्रीय एकात्मता दाखवणारे चित्र बुलढाण्याचे चित्रकार सेवानिवृत्त कला शिक्षक सुभाष देशमुख यांनी रेखाटले आहे. हे चित्र ते राहुल गांधी यांना देणार हाेते, परंतु ते देणे त्यांना शक्य झाले नाही.
एक दिवस विश्राम -
भारत जाेडाे यात्रा २० नाेव्हेंबर राेजी निमखेडी येथे पाेहोचणार आहे, तसेच २१ नाेव्हेंबर रोजी पदयात्रेला विश्राम असून, २२ नाेव्हेंबरला सकाळी ही यात्रा महाराष्ट्रातून मध्य प्रदेशात जाणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जयराम रमेश यांनी दिली.