उंचीने लहान अतुलची भारत जोडो यात्रेत ३८० किमीपर्यंत उडी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 12:17 PM2022-11-21T12:17:34+5:302022-11-21T12:18:21+5:30
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर देगलूर येथे त्यांचे स्वागत केले. तेव्हापासूनच या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले.
जळगाव जामोद (जि. बुलढाणा) - भारत जोडो यात्रेत समाजातील उपेक्षित आणि दिव्यांगही सहभागी होत आहेत. यात्रेला दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, एकाने ‘मूर्ती लहान; पण कीर्ती महान’चा प्रत्यय देत, भारत जोडो यात्रेत ३८० किलोमीटरपर्यंतचा प्रवास केला आहे.
भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात दाखल झाल्यानंतर देगलूर येथे त्यांचे स्वागत केले. तेव्हापासूनच या यात्रेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. ही यात्रा आपल्यासाठी आनंदाची पर्वणी असल्याचे अतुल भास्कर इंगळे (रा. बोदवड, ता. भुसावळ) म्हणाला. बुटका असला तरी आपल्या अफाट कर्तृत्वाने त्याची ओळख अतुल दबंग म्हणून समाजमनात निर्माण केली आहे. या यात्रेदरम्यान त्याने एक तास खासदार राहुल गांधी यांच्यासोबत घालविला. त्यांचा अमूल्य वेळ आपल्याला मिळाल्याने जीवनाचे सोने झाल्याचे तो कृतार्थपणे मान्य करतो. शंभर सिनेमामध्ये काम करणारा अतुल सद्य:स्थितीत नालासोपारा येथील ३०० जणांच्या आश्रमात वास्तव्यास आहे. आघाडीच्या दबंग ०२, घनचक्कर, झिरो, अल्लाह मेहरबान या चित्रपटांसह बिग बॉसमध्येही त्याने काम केले.
तू तो बहोत क्यूट है...
राहुल गांधी हे माझ्याशी संवाद साधताना ‘तू तो बहोत क्यूट है’ म्हणाले. त्यांच्याशी विकलांगांच्या रोजगारासोबतच विविध समस्यांबाबत चर्चा केली. समस्यांचे निराकरण करण्यासाठी साकडे घातले, असे अतुलने सांगितले.