Bharat Jodo Yatra: रस्त्यावर उतरा, लोकांचा आवाज ऐका; मग कळेल द्वेष, भीती कुठेय! संतनगरी शेगावातील प्रचंड सभेत राहुल गांधी यांचा विरोधकांना सल्ला
By किरण अग्रवाल | Published: November 19, 2022 08:27 AM2022-11-19T08:27:22+5:302022-11-19T08:28:12+5:30
Rahul Gandhi: द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेगावमध्ये झालेल्या प्रचंड सभेत विरोधकांना दिला.
- किरण अग्रवाल/राजेश शेगोकार
शेगाव : द्वेष, हिंसा आणि भीती यामधून कोणाचाही विकास होऊ शकत नाही. लोकांना जिंकायचं असेल तर त्यांच्याशी बोला. त्यांना ऐकून घ्या. त्यांना प्रेम द्या. यासाठी रस्त्यावर चालावे लागेल. रस्त्यावर चाललात तर तुम्हाला जनतेची दुःखे समजतील, असा सल्ला काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी शेगावमध्ये झालेल्या प्रचंड सभेत विरोधकांना दिला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या संदर्भाने महाराष्ट्रात वाद उपस्थित झाला असताना या वादावर भाष्य करणे टाळत त्यांनी इतर मुद्द्यांवर भर दिला.
भारत जोडो यात्रेची महाराष्ट्रातील अखेरची सभा शुक्रवारी संतनगरी शेगावात पार पडली. लाखो जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या सभेत राहुल गांधी यांनी ‘संत गजानन महाराज की जय’ अशी सुरूवात करत यात्रेतील आतापर्यंतचे अनुभव सांगितले. यात्रेदरम्यान स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या अनुषंगाने त्यांनी केलेल्या टिप्पणीनंतर राजकीय वातावरण तापलेले असतानाच हा विषय टाळत त्यांनी ‘नफरत छोडो’ याच मुद्द्याभोवती संवाद साधला.
शेतकरी आत्महत्या करतो. त्यांच्या डोक्यावर कर्ज असते. परंतु, ते आज वाऱ्यावर आहेत. या देशातील पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचे मनापासून ऐकले तर त्यांना शेतकऱ्यांची व्यथा कळेल. त्यांना मदत करता येईल.
‘संत गजानन महाराज की जय’ अशी भाषणाची सुरुवात... म्हणाले
असह्य परिस्थितीमुळे शेतकरी आत्महत्या करीत असून त्यांचे कर्ज माफ करत नाहीत. माेठ्या उद्याेगपतींचे अब्जावधी रुपये माफ केले जात आहेत.
मी मन की बात करायला आलो नसून मी तुमचा आवाज ऐकायला आलो.
भाजपने घराघरांत भांडणे लावली. ज्या घरांमध्ये द्वेष असताे, भांडणं असतात, त्या घराचे नुकसान हाेते. मग देशात भांडणे लावली तर देशाचा फायदा हाेईल का.
संत परंपरेेने प्रेम शिकविले
महाराष्ट्रातील संतांच्या नावांचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी संतपरंपरेचा गाैरव केला. या सर्व संतांनी प्रेमाचा संदेश दिला. हाच संदेश घेऊन भारत जाेडाे यात्रा निघाली असल्याचे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचा आवाज
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत. ते छत्रपती झाले; कारण त्यांनी लाेकांचा आवाज ऐकला. ते महाराष्ट्राचा आवाज आहेत. त्यांना घडविण्याचे काम राष्ट्रमाता जिजाऊंनी केले, हे आपणास विसरून चालणार नाही, अशा शब्दांत त्यांनी छत्रपतींचे स्मरण केले.
मान्यवरांची मांदियाळी...
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, के. सी. वेणुगोपाल, राज्याचे प्रभारी एच. के. पटेल, माजी केंद्रीय मंत्री जयराम रमेश, मुकुल वासनिक, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व पृथ्वीराज चव्हाण, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळातील पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, कन्हैया कुमार, महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, भाई जगताप, यशोमती ठाकूर, आ. सुधीर तांबे, आ. कुणाल पाटील, आ. विश्वजित कदम, आ. प्रणिती शिंदे, आ. अमित देशमुख, आ. सतेज पाटील, आ. हिरामण खोसकर, रजनी पाटील, अविनाश पांडे, माणिकराव ठाकरे, संजय निरूपम, सत्यजित तांबे, राष्ट्रवादीचे डॉ. राजेश टोपे, अरुण गुजराथी, आ. एकनाथ खडसे, फौजिया खान, डॉ. कैलास कमोद, शिवसेनेचे प्रा. नरेंद्र खेडेकर, आदींची मुख्य व्यासपीठावर उपस्थिती होती.